अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रकृती खलावली; दिल्लीच्या AIIMS हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल

नवी दिल्ली : वृत्त संस्था – अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजनचा कोविड 19 चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर त्यास नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले आहे.

तिहार जेल अधिकार्‍यांनी सोमवारी येथे एका सत्र न्यायालयाला यासंबंधी माहिती दिली. 2015 मध्ये, बाली, इंडोनेशियातून अटक केल्यानंतर राजन, नवी दिल्लीत उच्च सुरक्षेत तिहार जेलमध्ये बंद आहे. मुंबईत त्याच्याविरूद्ध प्रलंबित सर्व गुन्हेगारी प्रकरणे सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आली होती आणि एका विशेष न्यायालयाचे गठण करण्यात आले होते.

सोमवारी तिहार जेलच्या एका सहायक जेलरने टेलीफोनहून सेशन कोर्टाला माहिती दिली की, ते एका प्रकरणात सुनावणीसाठी न्यायाधीशांसमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राजनला सादर करू शकत नाहीत, कारण गँगस्टर कोविड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळला आहे आणि त्यास एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.

राजन मुंबईत जबरदस्तीने वसूली आणि हत्येसंबंधीत 70 गुन्हेगारी प्रकरणांमध्ये आरोपी आहे. राजनला 2011मध्ये पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आणि 2018 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

मागील आठवड्यात, मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयाने 1993 च्या मुंबईतील साखळी बॉम्ब स्फोटातील एक आरोपी हनीफ कडावालाच्या हत्या प्रकरणातून राजन आणि त्याच्या साथीदाराला सोडले होते.