टपाल विभागाचा प्रताप, पोस्टाच्या तिकिटावर चक्क छोटा राजनचा फोटो

पोलीसनामा ऑनलाईन : टपाल विभागाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. टपाल तिकीट म्हटल की त्यावर अनेक महान व्यक्ती, स्मारक तसेच मोलाची कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचे फोटो छापलेले असतात. मात्र कानपूरच्या मुख्य टपाल कार्यालयाने चक्क अंडरवर्ल्ड डॉन माफियांचे फोटो टपाल तिकीटावर छापण्याचा प्रताप केला आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आणि बागपत जेलमध्ये मारला गेलेला गँगस्टर मुन्ना बजरंगी यांचे फोटो असलेले तिकीट प्रसिद्ध केले आहेत. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

टपाल विभागाच्या ‘माय स्टॅम्प’ योजनेअंतर्गत हे टपाल काढण्यात आले आहे. पाच रुपयांची ही 12 तिकीट छापण्यात आली आहेत. यामधील 12 फोटोंवर अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आणि इतर 12 फोटोंवर मुन्ना बजरंगीचा फोटो छापण्यात आले आहेत. हे तिकिट सोशल मिडियावर व्हायरल झाले असून टपाल विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

काय आहे माय स्टॅम्प योजना :
2017 मध्ये केंद्र सरकारकडून या योजनेची सुरुवात झाली. याअंतर्गत कोणतीही व्यक्ती आपला किंवा ओळखीतल्या एखाद्या व्यक्तीचा फोटो टपाल तिकीटावर छापून घेऊ शकतो. यासाठी 300 रुपये भरावे लागतात. हे तिकीट छापून घेण्यासाठी अर्जदाराला पासपोर्ट साइज फोटो तसेच संपूर्ण माहिती द्यावी लागते. एक फॉर्म भरुन द्यावा लागतो, ज्यामध्ये संपूर्ण माहिती घेतली जाते. मृत व्यक्तीचा फोटो टपाल तिकीटावर छापत नाहीत. यासाठी अर्जदाराला कार्यालयात हजर राहावे लागते. मात्र या प्रकरणी टपाल कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसत आहे.