खून अन् खंडणीच्या 200 केसेस, अशी झाली ‘अटक’ अंडरवर्ल्ड डॉन रवि पुजारीला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अंडरवर्ल्ड डॉन रवि पुजारी ला भारतीय तपास यंत्रणांच्या मदतीने पश्चिम आफ्रिकेच्या सेनेगल येथे अटक करण्यात आली आहे. सध्या रॉ चे अधिकारी आणि कर्नाटक पोलिस सेनेगलमध्ये आहेत आणि अधिकारी त्याच्या प्रत्यार्पणाची तयारी करत आहेत. शेवटच्या वेळी रवी पुजारी सेनेगल येथूनच पळाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, रवी पुजारीला भारतात आणण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. रविवारी त्याला भारतात आणले जाईल असे समजत आहे. जेव्हा रवि पुजारीला भारतात आणले जाईल तेव्हा ते कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात राहील. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रवी पुजारीला एका विमानात ठेवण्यात आले आहे. त्याला कोणत्याही वेळी भारतात पाठवले जाऊ शकते.

सांगितले जात आहे की, अंडरवर्ल्ड डॉन रवि पूजारी सेनेगल मध्ये अँटनी फर्नांडिस च्या नावाने पासपोर्ट तयार करून वास्तव्य करत होता. हा पासपोर्ट १० जुलै २०१३ ला जारी करण्यात आला असून ८ जुलै २०२३ पर्यंत वैध आहे.

पासपोर्टनुसार तो एक व्यावसायिक एजंट आहे. याचा अर्थ असा की तो एक व्यावसायिक म्हणून तेथे ओळखला जातो, जो सेनेगल, बुर्किना फासो आणि त्याच्या आसपासच्या देशांमध्ये ‘नमस्ते इंडिया’ नावाच्या रेस्टॉरंट्सची साखळी चालवितो. भारतीय गुप्तचर संस्था रॉ सध्या रवी पुजारीला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

रवी पुजारी जवळपास १५ वर्षांपासून भारतातून फरार होता. खंडणी, खून, ब्लॅकमेल आणि फसवणूकीसंबंधी अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिस त्याचा शोध घेत होते. सुमारे २०० प्रकरणात त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही बजावण्यात आली आहे. रवि पुजारी हा एका वेळी छोटा राजनसाठी काम करत होता. यापूर्वी हे दोघे १९९० पर्यंत दाऊद इब्राहिम सोबत होते.

जून २०१९ मध्ये अंडरवर्ल्ड डॉन रवि पुजारी सेनेगल कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर फरार झाला होता. त्याला २१ जानेवारी २०१९ रोजी सेनेगल येथे भारतीय एजन्सीच्या इनपुटवरून अटक करण्यात आली होती. रवी पुजारी हा आफ्रिकी देशात सेनेगलमध्ये राहत होता. भारतीय एजन्सी सतत त्याच्यावर नजर ठेवत होती. आता त्याला भारतात आणण्याची तयारी सुरू आहे.

रवी पुजारी याने बॉलीवूड स्टार आणि गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनाही खंडणीची धमकी दिली आहे. त्याच्याविरूद्ध कर्नाटक आणि मुंबई येथे ९८ खटले प्रलंबित आहेत. गेल्या वर्षी जून महिन्यात गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी पोलिसांत तक्रार दिली होती की अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

जिग्नेश यांनी सांगितले की त्यांना फोन कॉल आणि मॅसेज वरून धमकी देण्यात येत होती आणि धमकावणारा स्वत:ला रवी पुजारी सांगत होता. मेवाणी यांना फोन करणाऱ्या व्यक्तीने दावा केला होता की त्याचे नाव रवी पुजारी आहे आणि तो ऑस्ट्रेलिया मध्ये आहे. त्याने सांगितले की तो तेथूनच गोळी मारण्यास सांगू शकतो.

रवी पुजारीचे नाव गुन्हेगारीच्या जगात खूप चर्चित आहे. त्याचा मुख्य व्यवसाय म्हणजे मोठ्या लोकांकडून खंडणी करणे. खंडणी न भरल्याबद्दल रवी पुजारी व त्याच्या गुंडांनी खुनासारखे भयंकर गुन्हे घडवून आणले आहेत.