दुर्दैवी ! कोंढव्यात 11 वर्षांच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अंगणात लहान मुले खेळत असताना घराच्या शेजारी असणाऱ्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत पडल्याने एका 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कोंढवा परिसरात हा प्रकार घडला असून, याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पृथ्वीराज अजय साळुंखे (वय 11) असे मृत्यु झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी धनश्री साळुंखे (वय 28) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानुसार श्रीकृष्ण दिनकर ढमाले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जानेवारी रोजी दुपारी पृथ्वीराज हा श्रीकृष्ण ढमाले यांच्या मुलीसोबत त्यांच्या इमारतीच्या अंगणात खेळत होता. अंगणात पाण्याची टाकी आहे. पण त्यावर झाकण बसवलेले नव्हते. त्यामुळे ती उघडी होती. यावेळी पृथ्वीराज खेळत खेळत या पाण्याच्या टाकीत पडला. मुलीने हा प्रकार इतरांना सांगितला. पण पृथ्वीराज याचा बुडून मृत्यू झाला होता. यानंतर नातेवाईकांनी दोन दिवसांपूर्वी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर प्राथमिक चौकशी करण्यात आली. तसेच निष्काळजीपणा केल्याच्या आरोपीवरून श्रीकृष्ण ढमाले यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.