दुर्देवी ! ज्येष्ठ पत्रकार सोपान बोंगाणे, मोतिचंद बेदमुथा, अशोक तुपे यांचे निधन; पत्रकारितेवर शोककळा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सगळीकडे कोरोना संक्रमणाने घर केले असून यामुळे अनेक लोकांनी आपला प्राण गमावला आहे. अशातच एक दुर्देव म्हणजे अनेक संकटात, समस्यांत, सामोरे जाऊन जनतेपर्यंत त्याची सखोल आणि सत्यता माहिती देणारा लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला पत्रकारितामध्ये सुद्धा कोरोनानं घर केलं आहे. तर ठाण्यामधील ज्येष्ठ पत्रकार सोपान बोंगाणे (वय, ६७) यांचे आज पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात कोरोनाशी लढताना त्यांना अपयश आलं. बोंगाणे यांच्या निधनाने आधुनिक ठाण्याच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीचा साक्षीदार हरपल्याची भावना व्यक्त होते.

सोपान बोंगाणे हे मराठवाड्यातून नोकरीसाठी मुंबईत आले होते. बँक ऑफ इंडियात नोकरी करत असताना त्यांनी ठाणे शहरातील स्थानिक वृत्तपत्रात अंशकालीन बातमीदार म्हणून प्रारंभ केला. ठाणे जिह्यातील ग्रामीण भागातले विविध प्रश्न त्यांनी समोर आणले. नागरी समस्या, राजकीय, सामाजिक प्रश्नांवर अभ्यासपूर्ण वृत्तांकनही त्यांनी केले. नंतर त्यांनी दैनिक ‘सामना’ मध्येही काम केले. विविध वृत्तवाहिन्यांवर राजकीय विश्लेषक म्हणून ते सहभागी होत असत. मराठवाडा जनविकास परिषद, ठाणे संस्थेचे ते महासचिव होते.

हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचारदरम्यान धाराशीव मधील ज्येष्ठ पत्रकार मोतिचंद बेदमुथा (वय,६९) यांचे निधन झाले. महाराष्ट्र टाइम्स’चे जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले होते. तसेच धाराशीव येथील दैनिक ‘समय सारथी’चे ते संस्थापक संपादक होते. धाराशीव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रांत प्रतिनिधी म्हणूनही ते सध्या कार्यरत होते. तसेच जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले होते.

मूळचे कान्हेगाव येथील असलेले श्रीरामपूर मधील दैनिक ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ पत्रकार अशोक दगडू तुपे (वय ५७) यांचे आज दुपारी नगर येथे खासगी रुग्णालयात निधन झाले. तुपे यांना ८ दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर नगरमधील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. कोरोनामधून ते बरेही झाले होते २ दिवसांनंतर त्यांना डिस्चार्ज मिळणार होता. परंतु, आज सकाळी तुपे यांना हृदयविकाराचा झटका आला. अशोक तुपे यांनी ३५ वर्षे पत्रकारितेत काम केले. महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कारासह त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले होते.