दुर्देवी ! कोरोनामुळं पतीचा मृत्यू झाल्यानंतर पत्नीची सॅनिटायझर पिऊन आत्महत्या; 6 वर्षाच्या मुलावरील माता-पित्याचं छत्र हरवलं

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनामुळे लाखो लोकांना जीव गमवावा लागत आहे. अनेकांचे हसतं-खेळत कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. अशीच एक मन सुन्न करणारी घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे. कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याचे समजताच पत्नीने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या केली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमधील सफीपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या दाम्पत्याला एक सहा वर्षांचा मुलगा आहे. आई-बाबांचा मृत्यू झाल्याने तो आता पोरका झाला आहे.

अंजली त्रिवेदी असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सफीपूरमध्ये राहणा-या त्रिवेदी कुटुंबातील एका सदस्याला कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी एका खासगी नर्सिंग होममध्ये दाखल केले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यावर ऑक्सिजन देखील देण्यात आला. मात्र याच दरम्यान अचानक त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे नातेवाईकांनी रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. मात्र पतीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने त्रिवेदी यांच्या पत्नी अंजली यांनी सॅनिटायझर पिऊन आत्महत्या केली आहे. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात तातडीने दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.