दुर्देवी ! सॉरी बाबा म्हणत अन् व्हिडीओ शेअर करत तरूणीची आत्महत्या

रांची : पोलीसनामा ऑनलाइन – एका रेल्वे कर्मचाऱ्याचा पत्नीचा मृतदेह घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. झारखंडच्या धनबाद येथील धनसार ठाणा क्षेत्रातील महावीरनगर भूदा येथे बुधवारी (दि. 19) ही धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी महिलेने सोशल मीडियावर आपला एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. व्हिडिओमध्ये तरुणी रडत-रडत सांगत आहे, की सासरचे लोक तिचा छळ करतात. दरम्यान या घटनेनंतर महिलेच्या पतीसह त्याचे संपूर्ण कुटुंब फरार आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

कोमल पटेल (वय 21) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती अलोक प्रसाद, त्याची आई आणि बहिणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कतरास बाजार येथील रहिवासी उमेश प्रसाद यांनी आपली मुलगी कोमलचा विवाह 2018 मध्ये धनबाद येथील अलोक प्रसादसोबत केला होता. लग्नात घरउपयोगी वस्तू, दागिने आणि 10 लाख रुपये दिले होते. दरम्यान लग्नानंतर कोमलच्या सासरच्या लोकांनी तिला मारहाण करण्यास आणि तिचा छळ करायला सुरुवात केली. या छळाला कंटाळून कोमलने बुधवारी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कोमल रडत-रडत आपली व्यथा मांडत आहे. ती यात म्हणते, की मी आत्महत्या करत आहे. सासरी येऊन मी चूक केली. सॉरी बाबा, मी तुमचं ऐकायला हव होते. मला अस वाटल की, माझा पती आता सुधारला आहे. मात्र, त्याने पुन्हा मला मारहाण करायला सुरवात केली आहे. मरण्याआधी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे बाबा, माझ्या मुलाची काळजी घ्या. कोमलचे हे शब्द शेवटचे ठरले. या घटनेनंतर मृत कोमलचे वडील उमेश प्रसाद यांनी धनसर ठाण्यात कोमलचा पती, सासू, नणंद विरोधात हुंड्यासाठी हत्या केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.