दुर्दैवी ! माजी आ. मोहन फड यांच्या मुलाचा अपघातात मृत्यू

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील उड्डाणपुलावर (10 जुलै) रोजी दुर्दैवी अपघाताची घटना घडली. या अपघाती घटनेत माजी आ. मोहन फड यांच्या लहान मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शिक्षण घेण्यासाठी मुंबई येथे असलेला पृथ्वीराज कोरोनामुळे शिक्षण संस्था बंद पडण्याच्या पार्श्वभूमीवर काही दिवसापूर्वी परभणीला परतला होता.

(10 जुलै) रोजी रात्रीच्या वेळी घडलेल्या या अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही. अपघाताची घटना शहरातील उड्डाणपुलावर घडली. अपघातामुळे पृथ्वीराजची घटनास्थळावर प्रकृती चिंताजनक होती. तेथे ये – जा करणार्‍या नागरिकांनी जखमी पृथ्वीराजला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले. तोपर्यंत पृथ्वीराज च्या अपघातात मृत्यू झाल्याची बातमी सर्वत्र पसरली होती. माहिती मिळताच फड कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेतली.

पृथ्वीराज च्या अपघाती मृत्यूने फड कुटुंबावर शोककळा पसरली आहे. फड कुटुंबीयांच्या या दु:खात मित्र परिवार, कार्यकर्ते, राजकीय नेते मंडळी, व्यापारी आदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या दु:खद भावना व्यक्त केल्या. या दुर्दैवी अपघाती घटनेत मृत्युने पृथ्वीराज ला अल्पवयातच गाठल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

नेहमीच हसतमुख असणाऱ्या पृथ्वीराज च्या अवेळी जाण्याने कुटुंबीय मित्र परिवाराला धक्का बसला, शनिवारी 11 जुलै रोजी सकाळी 9 वाजता पृथ्वीराज याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.