दुर्दैवी ! लहान बहिणीच्या BirthDay दिवशीच बहीण-भावाचा मृत्यू, कोल्हापूर जिल्हयातील घटना

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन –   घरात लहान बहिणीच्या वाढदिवसानिमित्त तयारी सुरु असतानाच बहीण-भावाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी (दि. 11) सायंकाळी हिडदुग्गी (ता. गडहिंग्लज) येथे ही घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

राजवीर किशोर तराळ (वय 8) व प्रेरणा मनोहर कांबळे (वय18, दोघेही रा. हिडदुग्गी) अशी या दुर्दैवी बहीण-भावाची नावे आहेत. याबाबत मनोहर कांबळे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किशोर तराळ हे कुटुंबीयांसह गोव्यात स्थायिक आहेत. भावाचे लग्न जमवण्यासाठी ते कुटुंबीयांसह महिनाभरापूर्वी गावाकडे आले आहेत. प्रेरणा कांबळे हिची लहान बहिण प्रज्ञा हिचा रविवारी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त घरात पाहुणे आले होते. सायंकाळी वाढदिवसाची तयारी सुरू होती. त्यावेळी प्रेरणा कपडे धुवून आणते असे सांगून विहिरीकडे गेली. तिच्यासोबत राजवीरही गेला. या वेळी हातपाय धुताना राजवीरचा पाय घसरून तो विहिरीत पडला. भावाला वाचवण्यासाठी प्रेरणाही पाण्यात उडी टाकली. मात्र तिलाही पोहता येत नव्हते. उशिरापर्यंत घरी न परतल्याने शोध घेतला असता दोघेही बुडाल्याचे दिसून आले. दोघांनाही बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.