‘युनिसेफ’ संमेलनात पाकिस्तानचा ‘मूर्खपणा’, काश्मीरचा मुद्दा उचलण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरच्या प्रश्नावर संपूर्ण जगभरात तोंडावर आपटल्यानंतर देखील पाकिस्तान त्यांच्या नापाक हरकती थांबवत नाहीये. अनेक प्रकारे ते काश्मीरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर उचलून धरण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेनंतर आता त्यांनी युनिसेफद्वारा कोलंबोमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दक्षिण आशियायी देशांच्या कॉन्फरन्समध्ये देखील हा मुद्दा उचलून धरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना काँग्रेस खासदार गौरव गोगोई आणि भाजप खासदार संजय जयस्वाल यांनी जबरदस्त उत्तर दिले.

ज्यावेळी पाकिस्तानच्या प्रतिनिधीने हा मुद्दा उचलून धरण्याचा प्रयत्न केला त्यावेळी या दोघांनी त्याला उत्तर देत काश्मिरचा मुद्दा हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे म्हटले. त्याचबरोबर दोघांनी पाकिस्तानमध्ये होत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा मुद्दा उपस्थित करत या प्रतिनिधीचे तोंड बंद केले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या संमेलनात पाकिस्तानच्या प्रतिनिधीने युनिसेफला हस्तक्षेपाची विनंती केली.

मात्र जयस्वाल यांनी यावर बोलताना म्हटले कि, पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरच्या परिस्थितीवर या ठिकाणी चर्चा व्हायला हवी. तर काँग्रेस खासदार गोगोई यांनी लहान मुलांवर होणारे अत्याचार आणि त्यांच्या हक्कांचे होणारे उल्लंघन यावर प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर इतर राष्ट्राच्या प्रतिनिधींनी पाकिस्तानच्या प्रतिनिधिनीला शांत राहण्यास सांगितले.

मालदीवमध्ये देखील उचलला होता मुद्दा
याआधी रविवारी पाकिस्तानच्या संसदेचे उपाध्यक्ष कासिम सूरीयांनी मालदीवमध्ये झालेल्या आशिया स्पीकर्सच्या बैठकीमध्ये देखील काश्मीर मुद्दा उचलून धरण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा भारताचे राज्यसभा उपाध्यक्ष हरिवंश यांनी कडाडून विरोध केला. त्यानंतर आयोजकांनी पाकिस्तानच्या प्रतिनिधीला शांत राहण्याची विनंती केली होती.