‘या’ 2 बँकांच्या विलीनीकरणाचा मार्ग मोकळा, बोर्डानं दिली मान्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – युनियन बँक ऑफ इंडियाच्या संचालक मंडळाने आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेला स्वतःमध्ये विलीनीकरण करण्यास मान्यता दिली आहे. तसेच चालू आर्थिक वर्षात बँकेच्या बोर्डाने 17,200 कोटी रुपये देण्यासही मंजुरी दिली आहे. सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

युनियन बँक बोर्डाची बैठकीत घेतलेले निर्णय
युनियन बँक ऑफ इंडियाच्या संचालक मंडळाने आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेला युनियन बँकेत विलीन होण्यासाठी मान्यता दिली आहे . या व्यतिरिक्त संचालक मंडळानेही 2019-20 मध्ये बँकेत 17,200 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीच्या सुधारित योजनेस मान्यता दिली असून यापैकी 13,000 कोटी रुपये इक्विटी कॅपिटलद्वारे आणि 4,200 कोटी रुपये टियर एक -टियर दोन बाँडद्वारे दिले जातील असे बँकेने म्हटले आहे.

इक्विटी शेअर्सद्वारे भांडवल वाढवण्याचा प्रयत्न
बँकेने सांगितले की, प्राधान्य वाटपाच्या माध्यमातून इक्विटी शेअर्स देऊन 13,000 कोटी रुपयांचे भांडवल उभारण्यास सरकारच्या मंडळाने मान्यता दिली आहे. यासाठी अन्य नियामक मान्यता मिळवल्या जाणार आहेत. 30 ऑगस्ट रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सार्वजनिक क्षेत्रातील 10 बँकांच्या चार बँकांत एकत्रिकरणाची घोषणा केली होती.

यापूर्वी 5 सप्टेंबर रोजी पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) संचालक मंडळाने ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनाइटेड बँक ऑफ इंडियाचे विलीनीकरण करण्यास मंजुरी दिली होती. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अलीकडेच ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनाइटेड बँकेचे पंजाब नॅशनल बँकेमध्ये, सिंडीकेट बँकेचे कॅनरा बँकेमध्ये, अलाहाबाद बँकेचे इंडियन बँक आणि आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचे युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण करण्याची घोषणा केली आहे.