टेंभू प्रकल्पाच्या ४ हजार कोटीच्या प्रस्तावास मान्यता…

तासगाव : पोलीसानाम ऑनलाईन – सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील सात तालुक्यामधील ८०४७२ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ देणाऱ्या टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाच्या रु. ४०८८.९४ कोटी रकमेच्या द्वितीय सुधारीत प्रशासकिय मान्यता अहवालास राज्य मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे सांगली जिल्ह्यातील कडेगांव, खानापूर, तासगांव, कवठेमहांकाळ, आटपाडी आणि सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील २४० दुष्काळग्रस्त गावाना सिंचनाचा लाभ देणारी टेंभू उपसा सिंचन योजना पूर्ण करणेचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.

सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागातील दुष्काळग्रस्त भागाला जलसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनाने रु. १४१६.५९ कोटी किमतीच्या टेंभू उपसा सिंचन योजना प्रकल्पास सन १९९६ मध्ये मूळ प्रशासकीय मान्यता प्रदान केली होती. मार्च २०१८ अखेर प्रकल्पावर
रु. २१०४ कोटी इतका खर्च झालेला आहे. प्रकल्पाच्या प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार इतका खर्च झाल्याने योजना पूर्ण करणेसाठी दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणे गरजेचे होते.आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत टेंभू योजनेला द्वितीय सुप्रमा मिळाल्यामुळे कामे वेगाने होण्यास मदत होणार आहे. खासदार संजयकाका पाटील पुढे म्हणाले, जलसंपदा विभागाने बंदिस्त नलिका पद्धतीने वितरण व्यवस्था करणेचे धोरण स्विकारले आहे. शासनाच्या या नवीन धोरणाचा अवलंब करून तयार करणेत आलेला टेंभू प्रकल्प हा पहिलाच मोठा प्रकल्प आहे. बंदिस्त नलिका धोरणामुळे टेंभू प्रकल्पाचे भूसंपादन क्षेत्र २३२३ हेक्टरने कमी होवून शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.

तसेच प्रकल्प खर्चामध्ये एकूण रु. ७०० कोटीची बचत झाली आहे. याअगोदर टेंभू प्रकल्पाचा समावेश केंद्र शासनाच्या ‘बळीराजा जलसंजीवनी योजने’अंतर्गत झाला असून, प्रकल्पास रु. १२०३.६६ कोटी इतका निधी मंजूर झाला आहे. टेंभू प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे टेंभू प्रकल्पाची कामे वेगाने पूर्ण करणेचा मार्ग मोकळा झाला असून प्रकल्पाची सर्व कामे पुढील
८ ते १० महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.