वृद्ध सासू-सासऱ्यांची जबाबदारी जावयावरही !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता केवळ मुलगाच नव्हे, तर जावईदेखील आपल्या वृद्ध सासू-सासऱ्यांना सांभाळण्यासाठी जबाबदार असेल. नवीन विधेयकानुसार ज्येष्ठ नागरिकाला मुलगा नसल्यास त्यांची जबाबदारी जावयावर असणार आहे. या जबाबदारीपासून त्याला दूर होता येणार नाही. ज्येष्ठ नागरिकांच्या हितांचे रक्षण आणि त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने जुन्या कायद्यात महत्त्वाचे बदल केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातील 2007 च्या कायद्यात सुधारणांस मंजुरी देण्यात आली. यामुळे ज्येष्ठांना मोठा दिलासा मिळणार आहे.

केंद्र सरकार सांभाळ कायद्याची व्याप्ती वाढवण्याच्या विचारात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या केअर सेंटरमध्येही बदल करण्यात येणार आहेत. त्यासाठी नवीन निकष तयार केले जाणार आहेत.ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण आणि पालनपोषण (सुधारणा) विधेयक, 2019 नुसार नवे बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत. आता संसदेत हे विधेयक मंजुरीसाठी मांडले जाईल.