केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना भेट, नारळाची MSP वाढवली

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : केंद्र सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत नारळ उत्पादक शेतकर्‍यांना भेट दिली आहे. बैठकीत कोपरा (सुके खोबरे) तयार करणार्‍या शेतकर्‍यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाने कोपराची एमएसपी (MSP) 375 रुपयांनी अधिक वाढवून 10,335 रुपये प्रति क्विंटल केली आहे. माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अर्थविषयक मंत्रिमंडळाच्या समितीच्या बैठकीत नारळाचा एमएसपी वाढविण्यास मान्यता देण्यात आली. ही माहिती देताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, बॉल कोपराला 10,600 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यात 55 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

 

 

 

 

 

 

भारत देश जगात कोपराच्या उत्पादन आणि उत्पादकतेमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. देशात नारळाचे उत्पादन सुमारे 1.5 कोटी टन आहे. 20 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये 30 लाख शेतकरी नारळाची लागवड करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सकाळी 10:30 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली.

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 30 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने आकाश क्षेपणास्त्र प्रणालीच्या निर्यातीला मान्यता दिली होती, ज्याचे लक्ष्य 5 बिलियन अमेरिकन डॉलर्सची संरक्षण निर्यात साध्य करणे आणि सहयोगी देशांशी सामरिक संबंध सुधारणे हे होते.