जागतिक आरोग्य संघटनेत डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे मोठी जबाबदारी, भूषविणार ‘हे’ पद

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कोरोनाच्या लढ्यात भारताकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची जागतिक स्तरावर स्तुती होती आहे. अशातच भारतासाठी एक मानाची आणि महत्त्वाची बाब म्हणजे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे जागतिक आरोग्य संघटनेतील मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या 34 सदस्यीय कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. हर्षवर्धन हे जपानचे डॉ. हिरोकी नकतानी यांची जागा घेणार आहेत. सध्या डॉ. नकतानी हे या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आहेत. भारताला कार्यकारी मंडळात सहभागी करण्यावर एकमत झाले आहे.

194 देशांनी या प्रस्तावावर स्वाक्षर्‍याही केल्या आहेत. तीन वर्षांसाठी कार्यकारी मंडळावर भारतीची नियुक्ती केली जाईल असा निर्णय मागील वर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशिया समुहाने सर्वांच्या संमतीने घेतला होता. 22 मे रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात येणार आहे. क्षेत्रीय समुहांमध्ये या कार्यकाळी मंडळाचे पद एका वर्षासाठी रोटेशनवर देण्यात येते.

22 मे पासून सुरू होणार्‍या पहिल्या वर्षासाठी हे पद भारताकडे देण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. हे पूर्णवेळ कामकाज नाही. परंतु डॉ. हर्षवर्धन यांना कार्यकाळी मंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षपदी राहण्याची आवश्यकता असणार आहे. कार्यकाळी मंडळाच्या वर्षातून दोन बैठका होतात आणि यापैकी मुख्य बैठक ही जानेवारी महिन्यात होते. आरोग्य सभेनंतर त्वरीत मे महिन्यात या मंडळाची एक बैठक आयोजित करण्यात येते.