‘ब्लॅक फंगसला महामारी घोषित करा’; केंद्राची राज्यांना सूचना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   जगभरात कोरोना व्हायरसचे थैमान सुरु आहे. रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण आता कोरोनाबाधितांना ब्लॅक फंगस या नव्या आजाराचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर आता ब्लॅक फंगसला महामारी घोषिक करा, असे केंद्र सरकारने राज्य सरकारांना म्हटले आहे.

केंद्र सरकारने राज्यांना सांगितले की, म्यूकर मायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगस या आजाराला महामारी रोग अधिनियम 1897 अंतर्गत अधिसूचित करावे. तसेच विविध राज्यांना या प्रकरणाची माहिती द्यावी, असे सांगितले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, सर्व सरकारी, खाजगी आरोग्य केंद्र आणि मेडिकल कॉलेज MoHFW आणि ICMR द्वारे जारी केलेल्या नियमावलींचे पालन करावे.

राजस्थान-तेलंगणा आणि दिल्लीने घेतला महत्वाचा निर्णय

यापूर्वी राजस्थान, तेलंगणाने महामारीच्या कायद्यांतर्गत ब्लॅक फंगसला अधिसूची रोग घोषित केले होते. तेलंगणा सरकारने कोविड-19 तून बरे होणाऱ्या रुग्णांना लक्ष्य करत आहे. सर्व सरकारी आणि खाजगी आरोग्य केंद्रातील दिशानिर्देशांचे पालन करावे. तर दुसरीकडे राजस्थान सरकारने राजस्थान महामारी अधिनियम 2020 च्या कलम 3 च्यासह म्यूकर मायकोसिसला महामारी म्हणून घोषित केले आहे.

दिल्लीत विशेष केंद्र बनवणार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी सांगितले की, दिल्ली सरकारच्या तीन रुग्णालयांमध्ये ब्लॅक फंगस किंवा म्यूकरमायकोसिसच्या उपचारासाठी दिल्लीत विशेष केंद्र बनवले जाणार आहे. केजरीवाल यांनी एका बैठकीत अधिकाऱ्यांना ब्लॅक फंगसच्या वाढत्या प्रकरणावर चर्चा केल्यानंतर ही घोषणा केली.

महाराष्ट्रात 90 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात आत्तापर्यंत म्युकरमायकोसिसने 90 जणांचा मृत्यू झाला आहे. ही गंभीर स्थिती आहे. त्यामुळे याला आपण गांभीर्याने घेण्याची गरज आहे. ब्लॅक फंगसचा आजार रोखण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णाने स्टेरॉईडचा वापर करू नये. राज्यात सध्या 1500 रुग्ण आहेत. त्यापैकी 850 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 500 रुग्ण उपचारानंतर घरी गेले आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.