खुल्या बाजारात सध्या नाही मिळणार कोरोना लस, केंद्र सरकारने सांगितले कारण

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणूविरूद्ध देशात लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. सध्या प्राधान्य गटातील 3 कोटी लोकांना लसी देण्यात येत आहे. सध्या खुल्या बाजारात कोरोना लसीच्या विक्रीची शक्यता कमी आहे. असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण (Union health secretary rajesh bhushan ) यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, कोविड लस प्राधान्य गटातील लोकांना सात ते आठ महिन्यांच्या आत लावण्याकडे केंद्र सरकारचे लक्ष आहे.

कंपन्यांकडून मागविला अधिक डेटा
भूषण म्हणाले की, देशात कोविशिल्ट आणि कोवाक्सिनच्या प्रतिबंधित आपत्कालीन वापरास मान्यता देण्यात आली आहे. या दोन्ही लस तयार करणार्‍या कंपन्यांकडून पुढील आकडेवारी मागविली गेली आहे. कंपन्यांनी आकडेवारी देण्यासाठी काही काळ मागितला आहे. या दोन कंपन्यांनी दिलेला डेटा मंजूर होईपर्यंत कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला (डीसीजीआय) खुल्या बाजारात ही लस विकायला परवानगी दिली जाऊ शकत नाही.

प्राधान्य गटांना लसी देण्यावर भर

भूषण यांनी सांगितले की, या दोन लसींना खुल्या बाजारात विक्रीसाठी किती काळ अधिकृत केले जाईल हे अद्याप ठरलेले नाही. सध्या सरकारचे लक्ष सात ते आठ महिन्यांत प्राधान्य गटातील लोकांना लसी देण्याकडे आहे. आपत्कालीन वापरासाठी मंजूर झालेल्या कोरोना लशीला भारतासह कोणत्याही देशात खुल्या बाजारात विक्रीस परवानगी नाही, असेही ते म्हणाले.

15,37,190 लोकांना मिळाली लस

डीसीजीआयने या महिन्याच्या सुरूवातीला ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवाक्सिनच्या प्रतिबंधित आपत्कालीन वापरास मान्यता दिली होती. यानंतरच, 16 जानेवारी रोजी कोरोना विषाणूंविरूद्ध देशभरात लसीकरण मोहीम सुरू झाली. या दोन्ही लसी लसीकरणात वापरल्या जात आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार 23 जानेवारीपर्यंत देशभरातील 27,776 सत्रांमध्ये एकूण 15,37,190 लोकांना लसी देण्यात आली आहे.