अमित शहांच्या तब्येतीत पुन्हा बिघाड, रात्री उशिरा ‘एम्स’मध्ये दाखल केलं

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अनेक दिवसांपासून आरोग्याच्या समस्यांशी झगडत आहेत. अशा परिस्थितीत अमित शहा यांना दिल्लीतील एम्समध्ये पुन्हा दाखल करण्यात आले आहे. शनिवारी रात्री 11 वाजता त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले.

गृहमंत्री अमित शहा यांना गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. दरम्यान, उपचारानंतर त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर अमित शहा यांना रुग्णालयातून सोडण्यात आले होते. मात्र, अमित शहा यांना आता पुन्हा श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शहा यांना एम्समधील कार्डिओ न्यूरो टॉवरमध्ये दाखल करण्यात आले आहे. अमित शहा यांना श्वास घेण्यात त्रास होत आहे. त्यामुळे अमित शाह यांनी काही काळ रुग्णालयात राहावे. त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली चांगले उपचार होतील, असे एम्सच्या सूत्रांनी सांगितले.

अमित शहा यांना याआधी 18 ऑगस्टला नवी दिल्ली येथील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. अमित शहा यांच्यावर एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वात असणाऱ्या डॉक्टरांच्या एका टीमच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. त्यांना ताप आल्यामुळे एम्समध्ये दाखल केले गेले होते.

अमित शहा यांना कोरोनाची लागण

2 ऑगस्ट रोजी अमित शहा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. नंतर त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सामान्य जनतेपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वांनी त्यांना लवकर स्वस्थ होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर बारा दिवसांनी म्हणजे 14 ऑगस्ट रोजी अमित शहा यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले.