केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा बंगाल दौरा रद्द ! इस्त्रायल दुतावासाजवळील बॉम्बस्फोटातील संशयित CCTV कैद

नवी दिल्ली : इस्त्रायल दुतावासाजवळ शुक्रवारी झालेल्या बॉम्बस्फोटामुळे देशभरात हाय अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपला पश्चिम बंगालचा २ दिवसांचा नियोजित दौरा रद्द केला आहे.

इस्त्रायल दुतावासापासून जवळच शुक्रवारी सायंकाळी बॉम्बस्फोट झाला. हा बॉम्बस्फोट कमी क्षमतेचा होता. बॉम्बस्फोट झाल्यानंतर संपूर्ण देशात हाय अलर्ट देण्यात आला आहे. बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच केंद्रीय तपास यंत्रणा, एनआयए, गुप्तचर संस्था, दिल्ली पोलीस सतर्क झाले. या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची तपासणी केल्यावर दोन संशयित बॉम्ब पेरताना आढळून आले. ते एका कॅबमधून तेथे आले. कॅबमधून उतरल्यावर त्यांनी तेथे बॉम्ब ठेवला व नंतर ते तेथून चालत निघून गेले. काही वेळाने त्यांनी ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाल्याचे दिसून आले आहे. हे दोन संशयित ज्या कॅबमधून आले होते. त्या कॅबचालकाची ओळख पटली असून त्याच्याकडून संशयितांची माहिती घेण्यात आली आहे. त्यावरुन पोलिसांनी संशयितांचे स्केच तयार करण्याचे काम सुरु झाले आहे.

पोलिसांना घटनास्थळावर काही बेअरिंग आणि छर्‍रे आढळून आले आहेत. त्याचबरोबर एक पत्र आढळून आले आहे. मात्र, त्या पत्रात नेमके काय म्हटले आहे, याची माहिती अद्याप समोर आली नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रात्री उशिरापर्यंत सुरक्षा अधिकार्‍यांच्या बैठका घेतल्या. संपूर्ण देशभरातील विमानतळावर तसेच महत्वांच्या ठिकाणी हाय अलर्ट देण्यात आला आहे.