CM योगी यांच्याबद्दल अमित शहांचा ‘खुलासा’, लोक फोन करून म्हणाले एका संन्याशाला CM का बनवलं ?

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी का आणि कोणत्या परिस्थीतीमध्ये देण्यात आली याचा खुलासा केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी केला आहे. अमीत शहा यांनी उत्तर प्रदेशमध्ये एका कार्यक्रमादरम्यान हा खुलासा केला. अडीच वर्षापूर्वी ज्यावेळी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदी योगी आदित्यनाथ यांच्या नावाची घोषणा झाली. त्यावेळी मला अनेकांनी फोन केले. ज्या माणसाने नगरपालिकेचे कामकाज पाहिले नाही, ज्याला मंत्रीपदाचा कोणताही अनुभव नाही, जो एक संन्याशी आहे अशा व्यक्तीला तुम्ही मुख्यमंत्री पदाची जबाबदारी का दिली, अशी विचारणा त्यावेळी करण्यात आली.

उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा योगी आदित्यानाथ यांच्याकडे सोपवली जाईल याची कोणालाही कल्पना त्यावेळी नव्हती. मात्र, आजची परिस्थिती पाहता योगींना मुख्यमंत्री करण्याचा आमचा निर्णय योग्य असल्याचे अमीत शहा यांनी कार्यक्रमादरम्यान सांगितले. अडीच वर्षापूर्वी उत्तर प्रदेशात भाजपाला विधानसभेत बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोणाला करायचे याचा विचार सुरू होता. या पदावर बसणारा व्यक्ती निस्वार्थी आणि कठोर मेहनत घेणारा असला पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझे मत होते. हे सर्व गुण योगी आदित्यनाथ यांच्याकडे असल्याने त्यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली, असे अमीत शहा यांनी स्पष्ट केले. योगींनी आमचा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिला आहे.

उत्तर प्रदेशच्या गोमतीनगरमधील इंदिरा गांधी प्रतिष्ठानमधील ग्राउंड ब्रेकिंग सेरेमनी-२ चे उद्घाटन शहा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि डॉ. दिनेश शर्मा उपस्थित होते.

यावेळी बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, आज राज्याने प्रत्येक क्षेत्रामध्ये आगेकूच केली आहे. राज्यात अनेक उद्योग येत आहेत. अमित शहा यांच्याहस्ते ६५ हजार कोटी रुपयांच्या योजनांची कोनशिला ठेवणार आहेत. रोजगार, कायदा आणि सुव्यवस्था आणि प्रत्येक क्षेत्रातील विकासाची योजना आमच्याकडे तयार आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त