केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांची तब्येत खालावली

पणजी : वृत्तसंस्था –   उत्तर गोव्याचे खासदार, केंद्रीय आयुष मंत्री तसेच केंद्रीय गृह राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे कोविड पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांना दहा दिवसांपूर्वी एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. आज (सोमवार) दुपारी त्यांची तब्येत आणखी खालावली आहे.

श्रीपाद नाईक यांची तब्येत खाल्यावल्यानंतर भारतीय संरक्षण दलाच्या इस्पितळातील एक पथक आणि एम्सचे एक पथक सायंकाळपर्यंत गोव्यात पोहचत आहे. या पथकाने तपासणी केल्यानंतरच त्यांना दिल्लीत हलविण्यासंबंधी निर्णय घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सकाळपासून त्यांची ऑक्सिजनची पातळी उतरल्याचे ते म्हणाले.

श्रीपाद हे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्रीही आहे. गोव्यात असताना त्यांनी कोविड तपासणी करुन घेतली व त्यात ते पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्यांना दोनापावल येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मागील दहा दिवसांपासून या ठिकाणी त्यांच्यावर उपचार घेत आहेत.