‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून नव्या गाईडलाईन्स जारी; चित्रपटगृहांना दिलासा

नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरसचा प्रभाव अद्यापही पूर्णपणे संपलेला नाही. केंद्र सरकारकडून आता हळूहळू सर्वच नियमांमध्ये शिथिलता आणली जात आहे. असे असताना आता केंद्रीय गृहमंत्रालयाने 1 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारीपर्यंत नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. मात्र, या नव्या गाईडलाईननुसार, बहुतांश नियमात बदल करून सूट देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

केंद्र सरकारने जारी केलेल्या गाईडलाईन्सनुसार, आता चित्रपटगृहांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेने लोकांना बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच स्वीमिंग पूल सर्वांसाठी उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना विविध स्तरावर उपाययोजना करण्याचे सांगण्यात आले आहे. तसेच कोरोनाचा फैलाव होऊ नये, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि SOP लागू करणे बंधनकारक केले आहे.

केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आदेशामध्ये सामाजिक, धार्मिक, खेळ, मनोरंजन, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या SOP नुसार, परवानगी दिली जाणार आहे.