अखेर शिवसेना-भाजपामध्ये ‘काडीमोड’, सेनेचे केंद्रीय मंत्री सावंत देणार ‘राजीनामा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळविण्यासाठी त्यांच्याकडून घालण्यात आलेली पहिली अट पाळण्याच्या दृष्टीने शिवसेनेने पाऊल टाकले असून भाजपापासून अधिकृतपणे काडीमोड घेत आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत हे आज सकाळी ११ वाजता आपला केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे. त्यासाठी ते दिल्लीत पत्रकार परिषद घेत आहे.

याबाबत अरविंद सावंत यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीआधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता. आता हा फॉर्म्युला नाकारुन शिवसेनेला खोटे ठरविण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभीमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे.

शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकारमध्ये तरी का रहायचे? असे सांगत अरविंद सावंत यांनी ट्रिव करीत आपण केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पाठिंबा हवा असेल तर भाजपाशी काडीमोड घेऊन केंद्रीय मंत्रीपद सोडण्याची पहिली अट काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने ठेवली होती. सावंत यांना राजीनामा देऊन शिवसेना आज एनडीएमधून अधिकृतपणे बाहेर पडत आहे.

 

Visit : Policenama.com