Video : आचारसंहितेवरुन केंद्रीय मंत्री, सरकारी अधिकाऱ्यांमध्ये ‘तू तू – मै मै’

बक्सर : वृत्तसंस्था – गेली पाच वर्षे सरकारी अधिकाऱ्यांना आपल्या म्हणण्यानुसार वागायला लावणारे केंद्रीय मंत्र्यांना आता आचारसंहिता लागू झाल्याने त्याच्या चौकटीत राहून प्रचार करावा लागत आहे. तर, निवडणुक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याकडे सरकारी अधिकाऱ्यांचा कटाक्ष आहे. त्यातून आता सत्ताधारी आणि सरकारी अधिकारी यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली आहे.

आचारसंहितेच्या अंमलबजावणीवरुन केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार चौबे आणि सरकारी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या वादावादीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

भाजपकडून दुसऱ्यांदा तिकीट मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार चौबे बक्सर या आपल्या मतदारसंघात आले. त्यावेळी त्यांच्याबरोबर वाहनांचा मोठा ताफा होता. ते पाहून बक्सर एसडीएम के. के. उपाध्याय यांनी ताफ्यात वाहनांची संख्या अधिक असल्याचे चौबे यांना सांगितले. त्यावर मंत्री चांगलेच संतापले. अशा प्रकारचा आदेश कुणी दिला आहे, अशी विचारणा ते करताना दिसतात.

एसडीएम उपाध्याय हे त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत असून मंत्री मात्र त्यांचे काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसून येत नाही. कोणाचा आदेश आहे, मला तुरुंगात पाठवा असे ते संतापून सांगत असल्याचे या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ऐकायला येत आहे.