केंद्रीयमंत्री भामरे, महाजनांसोबतची चर्चा निष्फळ

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन-केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे व राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी आज तब्बल चार तास झालेली चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे अण्णा हजारे यांचे उपोषण सुरूच आहे. सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. नुसतीच चर्चा करत आहे. चर्चेने प्रश्न सुटत नाही, असे अण्णा हजारे आज रात्री पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

कालची चर्चा निष्फळ ठरल्यामुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे आज पुन्हा राळेगणसिद्धीत आले होते. त्यांनी तब्बल साडेतीन तास अण्णांसोबत चर्चा केली. त्यानंतर केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हेही अण्णांच्या भेटीसाठी आले होते. त्यांनी अण्णांसोबत अर्धा तास चर्चा केली. परंतु कुठल्याही प्रकारचा तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे अण्णा आंदोलनावर ठाम आहेत. रात्री उशिरापर्यंत दोन्ही मंत्री राळेगणसिद्धीत ठाण मांडून होते.

आज दिवसभरातील घडामोडींबाबत पत्रकारांशी बोलताना अण्णा म्हणाले की, ‘केंद्र सरकार व राज्य सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे. 90 टक्के मागण्या मान्य झाल्याचे खोटे सांगत आहे. कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. फक्त चर्चा करून जात आहेत. चर्चा करून प्रश्न सुटत नाही. त्यासाठी ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. ठोस निर्णयशिवाय माझी भेट घेण्यासाठी येऊ नका, असे मी सांगितले होते. तरीही दोघेही आज मला भेटण्यासाठी आले. ठाम निर्णय होत नाही तोपर्यंत माझे उपोषण सुरूच राहणार आहे.’

आज दिवसभरातील चर्चा निष्फळ ठरल्यामुळे उद्या पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री राळेगणसिद्धीत येऊन अण्णांसोबत चर्चा करणार आहे. अण्णांच्या मागण्यांबाबत आता केंद्र व राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

”पोलीस आयुक्तांच्या खुर्चीचा अपमान झाल्याने मी संतप्त”