केंद्रीय मंत्र्याचा रुग्णांच्या नातेवाईकांना अजब सल्ला, म्हणाले – ‘बालाजीला नारळ अर्पण करा, सर्व काही ठीक होईल’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. तर दुसरीकडे मृतांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. याच दरम्यान कोरोना रुग्णांच्या भेटीसाठी रुग्णालयात गेलेल्या केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी त्यांच्या नातेवाईकांना अजब सल्ला दिला आहे. बालाजीला नारळ अर्पण करा, सर्व काही ठीक होईल, असे त्यांनी म्हटले आहे. शेखावत यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

केंद्रीय मंत्री शेखावत यांनी राजस्थानच्या जोधपूरमधील एका रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयात त्यांनी काही रुग्णांच्या नातेवाईकांची भेट घेतली. त्यावेळी दोन महिला प्रचंड रडत होत्या. त्यांनी यापुढे आमचे कसं होणार असा प्रश्न शेखावतांना विचारला त्यावर शेखावत यांनी देवावर विश्वास ठेवा तो सर्वकाही ठिक करेल, असे सांगितले. तसेच बालाजी महाराजाचे नामस्मरण करा. त्यांना नारळ वाहा सर्व काही ठीक होईल, असे शेखावत यांनी सांगितले. या घटनेनंतर शेखावत यांनी ट्विटरवरुन स्पष्टीकरण दिले आहे. डॉक्टर त्याचे काम करत आहेत. बालाजीवर श्रद्धा ठेवा आणि नारळ वाहा असा सल्ला देण्यात काय चुकीचे आहे, असा प्रश्न शेखावतांनी विचारला आहे. आपण केलेले वक्तव्य योग्यच असून रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांना मानसिक आधार देणे हे चुकीचे आहे का? असे म्हटले आहे. औषधांबरोबर प्रार्थनाही कामी येतील हे सांगायचे काम मी केले आहे. डॉक्टरांकडून मिळणाऱ्या उपचारांसंदर्भात मला काहीही शंका नसून ते त्यांची जबाबदारी अत्यंत योग्य पद्धतीने पार पाडत असल्याचे शेखावत यांनी म्हटले आहे. याबाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.