GDP आणि रोजगार निर्मितीकडे सरकारचे अधिक लक्ष : नितीन गडकरी

नागपूर : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पहिल्यांदाच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात आले होते. गडकरी यांचं नागपुरात जंगी स्वागत करण्यात आलं. गडकरी यांनी विजयानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. सिंचनाचे सगळे प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितलं. देशाचा जीडीपी वाढवणं आणि रोजगार निर्मिती करणं हा महत्त्वाचा मुद्दा आमच्या सरकारच्या दृष्टीने असल्याचेही नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं.

पत्रकार परिषदेत गडकरी म्हणाले की, नवीन योजना आणायच्या असून ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला अधिक प्राधान्य दिलं जाईल. विविध भागात रस्त्यांची कामं सुरू करण्यात आली आहेत. रस्त्यांच्या लगत १२५ कोटी वृक्ष लागवड करणार असल्याचं लक्ष्य आहे असंही गडकरींनी म्हटलं आहे. येणाऱ्या तीन वर्षात सगळ्या महामार्गांची कामं पूर्ण होतील. त्यासोबतच खादी ग्रामोद्योग, कृषी क्षेत्रात रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे. मी माझं काम जास्तीत जास्त करणार असून मी सर्वाधिक कार्यक्षम मंत्री आहे की नाही हे लोकांनी ठरवायचं आहे. मी स्वतः जेवढं काम करायचं तेवढं करत रहाणार आहे असंही गडकरी यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, गंगा शुद्धीकरणाचं काम मार्च २०२० पर्यंत करणार आहे. रोजगारनिर्मितासाठी शर्तीने प्रयत्न करणार असून इतर मंत्र्यांनाही मी माझ्या परिने सहकार्य करणार आहे असेही गडकरींनी यावेळी सांगितले आहे.

You might also like