मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गडकरींचे पहिले आश्वासन : ‘हा’ प्रकल्प करणार पूर्ण

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – नागपूरचे खासदार नितीन गडकरीवर सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कारभार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोपवला आहे. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नितीन गडकरी हे पहिल्यांदा नागपूरात आले. त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत घोषणा देत काही आश्वासने दिली.

लघू उद्योग आणि रोजगार निर्मिती करणं हे माझ्यापुढचं लक्ष्य आहे. अजून कोणतंही टार्गेट सेट केलेलं नाही. राज्यातले सगळे सिंचनाचे सगळे प्रकल्प पूर्ण करणार, असं महत्त्वपुर्ण आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसंच नवीन योजना आणायच्या आहेत. ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला प्राधान्य दिलं जाईल, असं गडकरींनी यावेळी सांगितलं. तसंच विविध भागात रस्त्यांची कामं सुरू करण्यात आली आहेत. रस्त्यांच्या लगत १२५ कोटी वृक्ष लागवड करणार असल्याचं लक्ष्य आहे, असंही त्यांनी सांगितलं.

येत्या तीन वर्षात सगळ्या महामार्गांची कामं पूर्ण होतील. खादी ग्रामोद्योग, कृषी क्षेत्रात रोजगार निर्मिती करणार आहे. खादीची निर्यात, मधाची निर्यात वाढवणं हे सध्या लक्ष्य ठेवलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसंच माझं काम मी जास्तीत जास्त करणार, मी सर्वाधिक कार्यक्षम मंत्री आहे की नाही हे लोकांनी ठरवायचं आहे. मी स्वतः जेवढं काम करायचं तेवढं करत रहाणार आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

मार्च २०२० पर्यंत गंगा शुद्धीकरणाचं काम करणार आहे. रोजगारनिर्मितासाठी कसोशीने प्रयत्न करणार आहे तसेच इतर मंत्र्यांनाही मी माझ्या परिने सहकार्य करणार आहे, असंही गडकरींनी यावेळी स्पष्ट केलं आहे.