मंदीबाबत रविशंकर प्रसादांचा यु-टर्न, म्हणाले -‘मी एक संवेदनशील व्यक्ती’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी अर्थव्यवस्थेतील मंदीबाबत केलेले वक्तव्य मागे घेतले आहे. शनिवारी रविशंकर प्रसाद यांनी अर्थव्यवस्थेतील मंदी पूर्णपणे नाकारली आणि भारतीय अर्थव्यवस्था उत्तम स्थितीत असल्याचा दाखल देताना त्यांनी चित्रपटांच्या कमाईचा उपयोग केला. रविशंकर प्रसाद म्हणाले आहेत की 2 ऑक्टोबरला रिलीज झालेल्या तीन चित्रपटांनी 120 कोटींची कमाई केली आहे. हे अर्थव्यवस्था तेजीत असल्याचे उदाहरण आहे.

रविशंकर प्रसाद म्हणाले की, पत्रकार परिषदेचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहे. तरीही माझ्या काही वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. याचे मला वाईट वाटते. मी एक संवेदनशील व्यक्ती आहे. म्हणून मी माझे विधान मागे घेतो.

अर्थव्यवस्थेत मंदी पूर्णपणे नाकारली –

नरिमन पॉइंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत रवीशंकर प्रसाद यांनी अर्थव्यवस्थेतील मंदीचे आणि बेरोजगारीचे दावे पूर्णपणे फेटाळून लावले होते. गांधी जयंतीनिमित्त असलेल्या सार्वजनिक सुटीच्या दिवशी तीन हिंदी चित्रपटांनी 120 कोटी रुपये कमविले. देशातील अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली असल्याशिवाय एकाच दिवसात इतकी कमाई होणे शक्‍य आहे का? असा सवाल त्यांनी केला होता.

विकासाचा दर सहा वर्षाच्या निच्चांकावर –

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विकासाचा दर सहा वर्षाच्या निच्चांकावर 5% पर्यंत पोहोचला आहे. रिझर्व्ह बँकेसह जगातील अनेक प्रमुख रेटिंग एजन्सींनीही भारताच्या वाढीचा दर कमी केला आहे. तथापि, सरकारने अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या उपायांची घोषणा केली आहे.

 

Visit : Policenama.com