‘शिवराई’ नाण्यांचा अनोखा संग्रह अकोल्यात !

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्यात स्वत:चे चलन सुरू केले होते. सोने आणि तांब्यापासून तयार केलेली ही नाणी शिवराई म्हणून ओळखली जातात. या शिवकालीन नाण्यांचा दुर्मिळ संग्रह अकोल्यातील अक्षय खाडे यांच्याकडे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674 मध्ये राज्याभिषेकाच्या वेळी सुवर्ण होन आणि तांब्याची शिवराई नाणी सुरू केली होती. यापैकी सुवर्ण होन हे केवळ राज्याभिषेकासाठीच होते. संग्राहक अक्षय खाडे यांच्याकडे शिवराई नाण्यांसह जगातील सर्व देशांच्या चलनी नोटा व ऐतिहासिक नाण्यांचा मोठा संग्रह आहे.

संग्राहक अक्षय खाडे यांनी सांगितले की, पेशवाईत तयार करण्यात आलेल्या शिवराई नाण्यांवर पुढील बाजूस श्री, राजा व मागील बाजूस छत्र, पती अशी अक्षरे आहेत. तर अन्य नाण्यांवर शमीपत्र, त्रिशुल, महादेवाची पिंड, बेलपत्र अशी वेगवेगळी चिन्हे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरु केलेली ही नाणी छत्रपती संभाजी महाराज, पेशवे व ब्रिटीश राजवटीच्या सुरुवातीच्या काळातही चलनात होती. विसाव्या शतकाच्या सुरूवातीपर्यंत शिवराई नाणी अस्तित्वात होती.

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकाच्या मुहूर्तावर सुवर्ण होन आणि तांब्याची शिवराई नाणी सुरू केली होती. यापैकी तांब्याची शिवराई नाणी चलनात होती. शिवराई नाण्याच्या पुढील बाजूस श्री, राजा, शिव ही अक्षरे, तर मागच्या बाजूस छत्र, पती अशी अक्षरे आहेत.