Unique devi temple : ‘या’ मंदिरात महिलांना प्रवेश आणि पूजा करण्यास आहे बंदी, वर्षात केवळ 5 तासासाठी उघडते

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  भारत हा मंदिरांचा देश असून येथील शेकडो मंदिरांमध्ये काही ना काही रहस्य आहे. काही मंदिरे वर्षभर खुली राहतात तर काही मंदिरांची दारे हिवाळ्यात बंद होतात आणि केवळ उन्हाळ्यात उघडतात. देवीच्या मंदिरांबाबत बोलायचे तर भारतात 51 शक्तिपीठ आहेत आणि प्रत्येक मंदिराचे आपले वेगळे वैशिष्ट्य आहे.

वर्षात केवळ 5 तास उघडते हे मंदिर

चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने आज अशा मंदिराबाबत जाणून घेवूयात ज्या मंदिराचे दरवाजे काही महिने, काही आठवडे किंवा काही दिवसांसाठी नव्हे तर केवळ 5 तासांसाठी उघडतात. या 5 तासांच्या कालावधीत हजारो भाविक मातेचे दर्शन घेण्यासाठी येतात. हे आगळे वेगळे मंदिर छत्तीसगढच्या गरियाबंद जिल्ह्यापासून 12 किलोमीटर दूर एका डोंगरावर आहे. या मंदिरात देवीची एक प्रतिमा आहे ज्यास लोक निरई माता म्हणतात.

सामान्यपणे देवी-देवतांच्या मंदिराबाहेर दिवसभर लोकांची रांग लागलेली असते, तर निरई मातेचे मंदिर नवरात्रीमध्ये एका विशिष्ट दिवशी उघडते आणि ते सुद्धा सकाळी 4 वाजल्यापासून सकाळी 9 वाजेपर्यंत पाच तास खुले राहते. इतर दिवशी मंदिराज जाण्यास बंदी आहे. इतर देवीच्या मंदिरांप्रमाणे येथे सिंदूर, कुंकू आणि श्रृंगार किंवा सौभाग्याचे साहित्य अर्पण केले जात नाही. तर केवळ नारळ आणि अगरबत्ती अर्पण करून मातेला प्रसन्न केले जाते.

लोककथा आणि मंदिराच्या जवळपास असलेल्या लोकांनुसार, निरई मातेच्या मंदिरात दरवर्षी चैत्र नवरात्रीच्या वेळी आपोआप तेलाशिवाय ज्योत प्रज्वलित होते आणि ही ज्योत कशी जळते हे अजूनपर्यंत रहस्य आहे. याशिवाय निरई मातेच्या मंदिरात महिलांना प्रवेश आणि पूजा करण्यास बंदी आहे. येथे केवळ पुरुषच पूजा करू शकतात. भाविकांची अशी श्रद्धा आहे की, या मंदिरात केलेला नवस पूर्ण होतो.