‘विवाह’ चित्रपटासाखा अनोखा विवाह, वधूच्या पाठीचं हाड मोडलं, तरीसुद्धा नवरदेवाने तिला स्वीकारलं

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  2006 साली आलेला सूरज बडजात्या निर्मित चित्रपट ‘विवाह’ प्रत्येकाला नक्कीच आठवत असेल, ज्यात वधू अमृता राव लग्नाच्या दिवशी तिच्या चुलतबहिणीला वाचवताना लग्नात आगीत भाजते, तरीदेखील शाहिद कपूर तिच्याशी लग्न करतो. हा रिअल लाइफवरील सिनेमा होता जो फारच गाजला. परंतु यूपीच्या प्रयागराजमध्येही असेच काहीसे घडले आहे.

हे प्रकरण संगम शहर प्रयागराजमध्ये पहायला मिळाले. नवविवाहित वधू आरती हाताला मेहंदी घेऊन रुग्णालयाच्या बेडवर पडली होती आणि तिच्या शेजारी बसलेला तरुण तिचा पती अवधेश आहे जो आपल्या पत्नीच्या देखरेखीसाठी तिथं बसला आहे.

खरं तर, प्रतापगडच्या कुंदा भागात राहणाऱ्या आरतीच्या लग्नाची तयारी पूर्ण झाली होती आणि 8 डिसेंबर रोजी संध्याकाळी वरात येणार होती, पण दुपारी टेरेसवर खेळत असलेल्या तीन वर्षांच्या पुतण्याला वाचवण्याच्या नादात आरती छतावरून खाली पडली आणि या अपघातात तिच्या पाठीचे हाड मोडले. घरातील लोकांनी तिला प्रयागराजमधील खासगी रुग्णालयात दाखल केले.

अवधेशच्या घरच्यांना याविषयी कळविले असता दोन जण त्याच्या घरातून या घटनेची चौकशी करण्यासाठी आले. हे प्रकरण अवधेशलाही समजले. आरतीच्या घरातील लोकांनी अवधेशला आरतीच्या धाकट्या बहिणीशी लग्न करण्यास सांगितले पण अवधेशने ठरवले होते की आरती हीच त्याची जीवनसाथी बनेल, मग आयुष्यभर तो तिची साथ देईल.

अवधेश आपली पत्नी आरतीची पूर्ण काळजी घेतो. या दोघांच्याही धाडस आणि धैर्याला जवळचे नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्य सलाम करत आहेत.

त्याच वेळी, आरतीच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांशी बोलल्यानंतर हॉस्पिटलमध्येच आरती आणि अवधेश यांची सर्व लग्न विधी पार पाडली. त्यानंतर आरतीला प्रयागराजमधील या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अवधेश आणि आरती स्वत:ला खूप भाग्यवान मानतात की अशा परिस्थितीत एकमेकांना आधार देऊन ते लोकांसाठी एक उदाहरण बनले आहेत. ते वास्तविक जीवनातील नायक बनले आहेत. या दोघांच्या या निर्णयाने प्रत्येकजण त्यांचे कौतुक करीत आहे.