‘अग्ग बाई, सासूबाई’ ! ‘महालक्ष्मी’चं रूप समजून ‘त्यांनी’ केली दोन्ही सुनांची ‘पूजा’

वाशीम : पोलीसनामा ऑनलाइन – प्रत्येकाच्या घरामध्ये गणेशोत्सवाची धामधुम सुरु आहे. गणेशोत्सवादरम्यान येणाऱ्या गौरीपूजन (महालक्ष्मी) घराघरात मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. घरात आलेल्या लक्ष्मीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते. मात्र, वाशीम येथील ड्रीम लँन्ड सिटीमध्ये एका घरात अनोख्या पद्धतीने गौरीपूजन करण्यात आले. या घरामध्ये चालत्या बोलत्या दोन लक्ष्मींचे पूजन करण्यात आले. सध्या परिसरात याच अनोख्या गौरीपूजनाची चर्चा जोरात सुरु आहे.

ड्रीम लँन्ड सिटीमध्ये राहणाऱ्या सिंधुबाई सोनुने यांनी यंदा अनोख्या पद्धतीने गौरीपूजन केले आहे. त्यांनी आपल्या दोन्ही सुनांना देवी स्वरूपात विराजमान करून त्यांची पूजा केली. सिंधुबाई यांनी जिवंत चालत्या बोलत्या महालक्ष्मीचे पूजन करून समाजासमोर आणि खास करून सुनांना त्रास देणाऱ्या सासवांसमोर नवा आदर्श ठेवला आहे.

सिंधुबाई यांना दोन मुले असून त्यांची एक सून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका आहे तर दुसरी गृहिणी आहे. रेखा आणि पल्लवी अशी त्यांची नावे आहेत. सासू आणि सुनांमधील सलोखा आणि जिव्हाळा कायम रहावा, हा या मागचा उद्देश असल्याचे सिंधुबाई यांनी म्हटले आहे. त्यांच्या या अनोख्या गौरीपूजनामुळे त्यांचे परिसरात कौतुक होत आहे. तसेच हे अनोखे गौरीपूजन पाहण्यासाठी नागरिकांनी त्यांच्या घरी गर्दी केली होती.