माजी आमदाराच्या निधनानंतर पत्नीनेही सोडले प्राण; एकाच चितेवर दोघांवरही अंत्यसंस्कार

पाटना : पोलीसनामा ऑनलाईन – 85 वर्षीय एका माजी आमदाराच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासातच त्यांच्या पत्नीने प्राण सोडले आहे. बिहारमधील गोपालगंजमध्ये ही घटना घडली आहे. नवरा-बायकोचे हे अनोखे प्रेम पाहून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बैकुंठपूरमधील महारानी पनडूही टोला येथे नवासे येथील राहणारे माजी आमदार राज नंदन राय यांचे सोमवारी रात्री उशिरा निधन झाले. त्यांना श्वास घेण्यास त्रास झाल्याने उपचारासाठी घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला. 85 माजी आमदारांच्या निधनाने दु:खी झालेली त्यांची पत्नी श्रद्धा देवी सतत पतीच्या पार्थिवाजवळ होत्या. त्यांना इतका धक्का बसला की त्यांचेही दोन तासानंतर निधन झाले.

राजनंदन राय यांनी 1969 मध्ये सीतमढी येथील सोनबरसा मधून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. ते शांत स्वभावाचे होते. ते अनेक वर्षांपासून तटोला येथे सासुरवाडीत राहत होते. माजी आमदार आपल्या पत्नीचा खूप विचार करीत होते. ते कुठेही गेले की सोबत जात होते. त्यांनी मृत्यू नंतरही एकमेकांची साथ सोडली नाही.

या जोडप्याच्या मृत्यूची माहिती त्यांच्या कुटूंबीयांना देण्यात आली.नवरा-बायकोचे हे अनोखे प्रेम पाहून कुटुंबीयांनी आणि नागरिकांनीही हळहळ व्यक्त केली. मंगळवारी सकाळी पती-पत्नी दोघांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मोहम्मदपूरमधील डुमरिया येथील पवित्र नारायणी नदीच्या महारानी घाटावर या जोडप्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.