कोल्हापुरात चक्क झाडावर बसून अनोखे आंदोलन

कोल्हापूर : पोलीसनामा आॅनलाईन

प्रतिनिधी:शिल्पा माजगांवकर

साडेपाच गुंटे जमीन खोट्या सही आणि शिक्क्यांनी खरेदी करणाऱ्यांवर तसेच या खोट्या व्यवहारात मदत करणाऱ्या तलाठ्यावर वर कारवाई व्हावी या मागणी साठी दोन आंदोलक चक्क कोल्हापूरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर येवून बसले आहेत.आणि या दोघांचे हे अनोखे आंदोलन चांगलेच चर्चेत आले आहे.

कॉम्रेड शिवाजी गुरव आणि एका व्यक्तीने हे आंदोलन सुरु केले आहे. काल पासून ते जिल्हाधिकारी कार्यालया समोरील झाडावर बसून आपल्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांच्या पर्यत पोहचवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आजरा तालुक्यातील आर्दाळ या गावातील एका वृध्द महिलेने गट नंबर 71 मध्ये साडेपाच गुंठे जमीन खरेदी केली होती. मात्र याच परिसरातील सुहास गुरव या व्यक्तीने गावकामगार तलाठी सुंदर जाधव याच्या मदतीने ही खरेदी “तुकडे जोड, तुकडे बंदी” च्या कायद्याचा बडगा दाखवून रद्द केली होती. त्या नंतर पुन्हा सुहास गुरव याने तलाठ्याच्या मदतीने हिच जमीन चुकीचा नकाशा आणि कागदपत्रे दाखवून खरेदी केली आहे. या दोघांवरही कारवाई व्हावी या मागणी साठी कॉम्रेड शिवाजी गुरव आणि एका व्यक्तीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढून आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यत दोषावर कारवाई होत नाही, त्याच्यावर गुन्हे दाखल होत नाही. तो पर्यत हे आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. कालपासून सुरु असलेल्या या आंदोलनाची दखल अद्याप घेतली गेलेली नाही . पण या अनोख्या आंदोलनाची चर्चा मात्र सर्वत्र होत आहे.