अमेरिकेमध्ये ‘कोरोना’ लशीची खासगी विमानातून डिलिव्हरी सुरू, तयार केले सुटकेस सारखे बॉक्स

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोना लस (covid-19-vaccines) वितरणासाठी अमेरिकेत चार्टर फ्लाइट्स (charter-flights) सुरू केली आहे. फायझरची कोरोना लस युनायटेड एअरलाइन्सच्या विमानाने एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पाठविली जात आहे. त्यासाठी फायझरने सूटकेसच्या आकाराचे बॉक्स तयार केले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी फायझरने म्हटले आहे की, त्याची कोरोना लस 95 टक्के प्रभावी आहे. फायझर कंपनीच्या योजनेनुसार, अमेरिकेतील लसीकरण केंद्राच्या अगदी जवळपर्यंत फ्लाइट्समधून लस वितरीत केली जाणार आहे. मात्र, वितरण केंद्रापासून लसीकरण केंद्रापर्यंत कोरोना लस पोहोचण्यास तीन दिवसांचा कालावधी लागतो. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, जागतिक पुरवठा आणि वितरणासाठी फ्लाइटमधून लस पाठविणे ही एक महत्त्वपूर्ण तयारी आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेत लसीकरण सुरू होण्याची अपेक्षा आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून लवकरच या लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. युनायटेड एअरलाइन्सलाही लस पुरवण्यासाठी फ्लाइट्समध्ये अतिरिक्त बर्फ ठेवण्यास मंजुरी दिली आहे. फायझरची लस उणे 70 डिग्री सेल्सियसवर ठेवावी लागते. लसीच्या पुरवठ्यासाठी फायझरने सूटकेसच्या आकाराचे बॉक्स तयार केले आहेत.

फायझरने याआधी सांगितले होते की, अमेरिका आणि युरोपमधील कंपनीच्या स्टोअरमध्ये आधीपासूनच लसीचे लाखो डोस तयार केले आहेत. त्यामुळे वितरणाची तयारी केली जात आहे. जेणेकरुन या लसीला मंजुरी मिळाताच वितरण सुरू होऊ शकेल. कंपनी दररोज 20 फ्लाइटमधून लस वितरीत करणार आहे.