Video : ‘या’ देशानं निभावली ‘मैत्री’ ; शपथविधीवेळी भल्या मोठ्या ‘टॉवर’वर चमकले मोदी

अबुधाबी : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकांत दणदणीत यश मिळवल्यानंतर नरेंद्र मोदींनी काल दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. याबद्दल भारताचा मित्र असणाऱ्या संयुक्त अरब अमिरातने मोदींचे विशेष कौतुक केले आहे. शपथविधीवेळी अबुधाबीच्या एका तेल कंपनीच्या मुख्यालयाच्या इमारतीवर मोदींच्या फोटोची डिजिटल स्क्रीन लावण्यात आली होती. मोदींसोबत प्रिन्स आणि युएईचे सुप्रिम कमांडरचे फोटो झळकले आहेत. मोदी यांचे फोटो इमारतीवर झळकवितानाचा व्हिडीओ तेथील भारतीय दूतावासाने ट्विट केला आहे.

भारतीय दूतावासाने ट्विटरवर म्हंटल आहे की, ‘ही खरी मैत्री आहे. मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी शपथ घेतली आहे. भारतासोबतच्या ऐतिहासिक मैत्री आणि धोरणांसाठी नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे मैत्रीपूर्ण संबंध उपयुक्त ठरतील.’

अबुधाबी राष्ट्रीय तेल कंपन्यांची कार्पोरेट कार्यालये असणाऱ्या इमारतीवर मोदींच्या शपथविधीवेळी डिजिटल स्क्रीनवर त्यांचे छायाचित्र झळकावून संयुक्त अरब अमिरातने मैत्री निभावली आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरातीचा (यूएई) सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘झायेद मेडल’ने गौरवण्यात आले होते. यूएईचे राजपुत्र मोहम्मद बिन झायेद यांनी ट्विट करत स्वतः याबाबत माहिती दिली होती.