मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात चीनचा पुन्हा अडथळा 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चीनमुळे अपयश आले आहे. फ्रान्सने याबाबतचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघात आणला होता. अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरवण्याची चीनची ही चौथी वेळ आहे.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्या पाकिस्तानमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये पुन्हा एकदा चीनने खोडा घातला. पुलवामा हल्ल्यानंतर फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिका यांनी २७ फेब्रुवारी रोजी अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव सादर केला होता. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात चीनने पुन्हा नकाराधिकाराचा वापर केला आहे. त्यामुळे भारताला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. पुलवामातील हल्ल्यानंतर भारतानं जैश आणि मसूदच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण कागदपत्रं अमेरिका आणि फ्रान्सला दिली होती. संयुक्त राष्ट्रातही भारतानं मसूदविरोधात सबळ पुरावे दिले होते. त्यामुळे भारताला अमेरिकेची भक्कम साथ मिळाली होती.

अझहरला पाठीशी घालत चीनची पाकिस्तानला अप्रत्यक्ष मदत –

सुरक्षा परिषदेतील कायम पाच आणि हंगामी १० सदस्यांना कामकाजाच्या १० दिवसांमध्ये आक्षेप सादर करावा लागतो. ही मुदत भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी मध्यरात्रीनंतर संपत होती. तोपर्यंत आक्षेप आला नाही, तर संबंधित दहशतवादी हा जागतिक दहशतवादी ठरतो. मात्र चीनने भारताच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे. चीनने नेहमीच अझहरला पाठिशी घातले आहे. २००९, २०१६ आणि २०१७ मध्ये या संदर्भातील प्रस्तावावर चीनने नकाराधिकाराचा वापर करत खोडा घातला होता.

कोण आहे मसूद अजहर –

मसूद अजहर हा  जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात मसूद अझहरच्या  जैश-ए-मोहम्मदचा हात होता. भारताविरुद्ध कारवाया करणे  आणि पाकिस्तानमधील तरुणांची माथी भडकाविण्याचे काम मसूद अझहर गेल्या काही वर्षांपासून करीत आहे. मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत मसूद अझहरचं नाव पहिलं आहे. तो हरकत-उल-अंसार या संघटनेत सामील झाला होता. पहिल्यांदा १९९४ मध्ये त्याला दहशतवादी कारवाया प्रकरणी श्रीनगरमध्ये अटक केली होती.

जैश-ए-मोहम्मदची स्थापना –

नेपाळची राजधानी काठमांडू येथून दिल्ली येथे जात असलेल्या विमानाचे दहशतवाद्यांनी २४ डिसेंबर, १९९९ रोजी अपहरण केले होते. प्रवाशांच्या मुक्ततेसाठी अटल बिहारी वाजपेयी सरकारने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मसूद अजहरसह तीन दहशतवाद्यांची सुटका केली होती. सुटकेनंतर त्याने पाकिस्तानमधील कराचीत ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेची स्थापना १९९९ मध्ये केली होती.

संसदेवर हल्ला –

जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेच्या स्थापनेच्या वर्षभरातच २००१ मध्ये संसदेवर हल्ला केला होता. या हल्ल्यात ५ दहशतवाद्यांसह १४ जणांचा मृत्यू झाला आणि १८ जखमी झाले. भारतीय संसदेवरील हल्ल्यानंतर अझहरला पाकिस्तानमध्ये अटक केली होती. पण कुठलाही पुरावा नसल्याच्या कारणावरून लाहोर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २००२ मध्ये त्याची सुटका करण्यात आली होती.

ह्याही बातम्या वाचा –  

पुण्यात छऱ्याच्या बंदुकीतून मित्रावर गोळीबार 

दारु पिण्याच्या वादातून खडकी बाजारमध्ये खुन 

अमेरिकेतील अभियंत्याने लग्नाच्या अमिषाने महिलेला घातला १७ लाखाचा गंडा 

मी बारामती जिंकून दाखवेल : गिरीश महाजन 

हिंमत असेल तर मोदींनी ‘येथून’ निवडणूक लढवावी : ममता बॅनर्जी