संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अमेरिकेला झटका, इराणवर निर्बंध

संयुक्त राष्ट्र : वृत्तसंस्था – संयुक्त अरब अमिरात आणि इस्त्रायलमधील मैत्री करार करण्यास महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या अमेरिकेला संयुक्त राष्ट्र संघात मोठा धक्का बसला आहे. इराणवर शस्त्र निर्बंध अनिश्चित काळासाठी वाढवण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने फेटाळला आहे. प्रस्ताव फेटाळल्यामुळे तीळपापड झालेल्या अमेरिकेने हा प्रस्ताव पुन्हा आणण्यासाठी पावलं उचलणार असल्याचे म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या 15 सदस्यीय परिषदेत शुक्रवारी झालेल्या प्रस्ताव मतदानावर प्रत्येकी दोन-दोन देशांनी समर्थन व विरोधात मतदान केले. अमेरिकेच्या प्रस्तावाला फक्त डॉमनिक प्रजासत्ताक देशाचा पाठिंबा मिळाला, तर अमेरिकेच्या प्रस्तावाच्या विरोधात रशिया आणि चीनने मतदान केले. तर 11 देशांची अनुपस्थिती होती. जर्मन, फ्रान्स, ब्रिटन यांच्यासह 8 देशांनी मतदानात सहभाग घेतला नाही. प्रस्ताव मंजूर होण्यासाठी कमीत कमी 9 देशांचा पाठिंबा आवश्यक आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि शांतता ठेवणे ही सुरक्षा समतिची जबाबदारी आहे. मात्र, संयुक्त राष्ट्र संघाची सुरक्षा परिषद यामध्ये अपयशी ठरली असल्याची टीका पॉम्पिओ यांनी केली. इराणवर 13 वर्षे जुने शस्त्र निर्बंधाचा काळ वाढवण्यासाठीचा प्रस्ताव फेटाळण्यात आला असून संयुक्त राष्ट्र संघाच्या निर्बंधाशिवय अत्याधुनिक, घातक शस्त्रे खरेदी-विक्री करण्यासाठी आता दहशतवादाचा प्रायोजक असणाऱ्या देशाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे त्यांनी इराणचे नाव न घेता म्हटले.

माईक पोम्पिओ यांनी पुढे सांगितले की, दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशामुळे युरोप, पश्चिम आशिया आणि अन्य भागामध्ये धोका निर्माण होणार नाही यासाठी शस्त्र खरेदी-विक्री करण्याचे स्वातंत्र्य मिळू नये यासाठी आम्ही काळजी घेणार आहोत. तर संयुक्त राष्ट्र संघातील अमेरिकेचे स्थायी प्रतिनिधी कॅली क्राफ्ट यांनी सांगितले की, अमेरिकेचा प्रस्ताव फेटाळल्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाची सर्वात वाईट प्रवृत्ती सुरक्षा परिषदेत पहायला मिळाली. नियमानुसार, अमेरिकेकडे संयुक्त राष्ट्र संघाच्या आधीच्या प्रस्तावांना पुन्हा लागू करण्यासाठी आवश्यक ती पवलं उचण्याचा अधिकार आहे.