अमेरिकाच्या ‘या’ घोषणेमुळे हजारो भारतीयांना फटका !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे विद्यार्थी व्हिसावर अमिरेकेत गेलेल्या विद्यार्थ्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. संसर्गामुळे ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण फक्त ऑनलाइन होत आहे अशा सर्व परदेशी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्याची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली आहे. इमिग्रेशन आणि सीमा शुल्क अंमलबजावणीकडून यासंबंधी घोषणा करण्यात आली आहे.

अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या विद्यापीठाने ऑनलाइन शिक्षणास सुरुवात केली असेल तर त्या विद्यार्थ्यांना देश सोडावा लागणार आहे. अन्यथा त्यांना हद्दपार केले जाईल असे आदेशात सागंण्यात आले आहे. अमेरिकेत अशा विद्यार्थ्यांना विद्यार्थी व्हिसावर प्रवेश दिला जाणार नाही. अमेरिकेच्या या निर्णयामुळे उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणार्‍या हजारो-लाखो विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे.

होमलँड सेक्युरिटी विभागाच्या आकडेवारीनुसार, सध्याच्या घडीला 11 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांकडे विद्यार्थी व्हिसा आहे. अमेरिकेतील परदेशी विद्यार्थ्यांमध्ये चीननंतर अनुक्रमे भारत, दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया आणि कॅनडा येथील विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. दरम्यान, प्रशासनाने सर्व विद्यापीठ आणि कॉलेजना सर्व कोर्सेस लवकरात लवकर ऑनलाइन सुरु कऱण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेने सर्व विद्यार्थ्यांना आपल्या देशात पाठवण्यासाठी योजना आखली आहे. अनेक भारतीय विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.