अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत UGC ला मिळाले देशातील 640 विद्यापीठांचे उत्तर, 177 युनिर्व्हसिटींना आता घ्यायचाय निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत युजीसीच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनंतर देशातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये संभ्रम आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) गुरुवारी सांगितले की, परीक्षा आयोजित करण्याची स्थिती सांगण्यासाठी विद्यापीठांना संपर्क साधण्यात आला होता. ६४० विद्यापीठांचे उत्तर मिळाले आहे. यापैकी ४५४ विद्यापीठांनी एकतर परीक्षा आयोजित घेतली आहे किंवा घेण्याची योजना आखत आहेत. १७७ विद्यापीठांमधील परीक्षांचा निर्णय अद्याप बाकी आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, यूजीसीने म्हटले की २७ खासगी विद्यापीठ, जी २०१९-२० दरम्यान स्थापित झाली आहेत, त्यांची पहिली तुकडी अंतिम वर्षाच्या परीक्षेस पात्र नाही.

यूजीसीच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांना ३० सप्टेंबरपर्यंत युजी आणि पीजी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे बंधनकारक आहे. सुधारित मार्गदर्शक सूचनांनंतर सर्वच राज्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, ओडिशा, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल या सरकारने त्यांच्या कार्यक्षेत्रातील विद्यापीठांच्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. यूजीसीने सर्व राज्यांना आपल्या राज्यातील सर्व विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे आवाहन केले होते. यूजीसीने म्हटले आहे की, देशात उच्च शिक्षण पातळीत एकरूपता असणे फार महत्वाचे आहे. त्यासाठीच मार्गदर्शक तत्त्वे स्वीकारली जातात व त्यांचे पालन केले जाते. त्या राज्यांनी देखील यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले पाहिजे आणि अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या पाहिजेत. जर आपण अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली नाही, तर यामुळे त्यांच्या पदवीच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित होतो. विद्यापीठे आणि महाविद्यालये ऑनलाइन, ऑफलाइन किंवा मिश्रित कोणत्याही मोडमध्ये परीक्षा घेऊ शकतात. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षांना जर एखादा विद्यार्थी बसू शकत नसेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ विशेष परीक्षा घेईल.

दिल्ली उच्च न्यायालयानेही परीक्षा आयोजित करण्याच्या मार्गदर्शक सूचनांबाबत केंद्र, यूजीसी आणि दिल्ली विद्यापीठाकडे उत्तर मागितले आहे.

शिक्षणतज्ञांनी यूजीसीला सांगितले, परीक्षा घेण्याच्या निर्णयाबद्दल पुन्हा विचार करा
अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी शिक्षणतज्ज्ञांनी यूजीसीला पत्र लिहिले आहे. युजीसीचे प्रमुख डीपी सिंह यांना लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे की, परीक्षांबाबत युजीसीची ताजी एडव्हायजरी दुर्दैवी आहे. ती आपल्याला पुढे नेण्याऐवजी मागे नेईल. यूजीसीच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार, सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांना ३० सप्टेंबरपर्यंत युजी आणि पीजी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे बंधनकारक आहे. पत्रात लिहिले आहे की, युजीसीच्या या निर्णयामुळे राज्यांच्या अनिश्चिततेचे युग सुरू होईल. कारण अनेक राज्यांनी यापूर्वीच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर यूजीसीचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात यांच्यासह अनेक शिक्षणतज्ञांनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत.