खळबळजनक : तरुणीने पूजा चव्हाणच्या बहिणीचा मोबाईल पळवला

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – तुझ्या बहिणीच्या मृत्यूबद्दल बोलायचे आहे, असे सांगून पूजा चव्हाणच्या बहिणीला बोलावून घेऊन तोंडाला स्कार्फ बांधलेल्या एका अनोळखी तरुणीने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला. गुरुवारी (दि. 4) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचे गुढ अद्याप उकलले नाही. त्यातच तिच्या बहिणीचा मोबाईल अज्ञात तरुणीने हिसकावून नेल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मोबाईल चोरण्याचा हेतू नेमका काय होता? मोबाईल चोरणारी तरुणी कोण होती ? त्या मोबाईलमध्ये नेमक काय दडलंय असे अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

या प्रकरणी दिव्यांगा लहू चव्हाण यांनी परळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. परळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पूजाची बहिण दिव्यांगा ही इयत्ता दहावीत शिकते. ती आणि तिचा मित्र सौरभ कराड हे दोघेही गुरुवारी संध्याकाळी परळीतील हनुमान गड परिसरात गेले होते. त्यावेळी तिला एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला. समोरील तरुणीने पूजा चव्हाणच्या मृत्यूबद्दल काही तरी बोलायचे आहे, असे सांगितले. त्यानंतर दिव्यांगा आणि सौरभ हे फाऊंडेशन शाळेजवळ पोहोचले. त्यावेळी अज्ञात तरुणीने पुन्हा एकदा फोन करून दोघांना शाळेच्या दुसऱ्या गेटजवळ बोलावले. दिव्यांगा फोनवर बोलत येताना समोरून आलेल्या तरुणीने अचानक तिच्या हातातून मोबाईल हिसकावून पळ काढला. सौरभ आणि दिव्यांगाने तिचा पाठलाग केला. पण काही अंतरावरच ती तरुणी एका तरुणाच्या दुचाकीवर बसून फरार झाली. याप्रकरणी दिव्यांगाने परळी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.