पुण्यासाठी Unlock-1.0 ठरला ‘घातक’ ! 25 दिवसांत ‘कोरोना’ रुग्णांची संख्या ‘तिप्पट’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. लॉकडाऊन नंतर आता अनलॉक सुरु करण्यात आले आहे. देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी अनलॉक 1 च्या टप्प्यात अनेक मोठ्या शहरातील उद्योगधंदे सुरु करण्यात आले. मात्र, याच दरम्यान या शहरांमधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. पुणे शहरात देखील ज्या भागामध्ये अद्याप कोरोनाने शिरकाव केला नव्हता, त्या भागात देखील कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. हे भाग आता शहरातील कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहेत. अशातच अनलॉक पुण्यासाठी घातक ठरल्याचे आकडेवारीवरून समोर आली आहे.

राज्यात लॉकडाऊननंतर नियमांमधे शिथिलता आणत अनलॉक सुरु करण्यात आले. लॉकडाऊन उठताच 25 दिवसांमध्ये पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या जवळपास तिपटीने वाढली आहे. 25 मार्चला लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर 14 एप्रिलपर्यंत पुणे शहरात 299 कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. तर 15 एप्रिल ते 3 मे या लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात पुण्यात 1444 रुग्ण आढळून आले होते. तर 4 मे ते 17 मे या तिसऱ्या टप्प्यात पुण्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन हा आकडा 1641 पर्यंत गेला.

18 मे ते 31 मे हा लॉकडाऊनचा चौथा टप्पा होता. या कालावधीत पुणे शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. या कालावधीत 2909 रुग्ण आढळून आले. मात्र, अनलॉकची प्रक्रिया सुरु होताच कोरोना संसर्गाने वेग घेतला आणि पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली. 1 जून ते 25 जून या अनलॉक-1 च्या कालावधीत शहरात तब्बल 8325 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे अनलॉकची प्रक्रिया पुणे शहरासाठी फायद्याची नाही तर घातक ठरली असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

कोरोना हॉटस्पॉट विभागनिहाय कसे वाढले ?
लॉकडाऊन 1 – भवानी पेठ (कासेवाडी), रविवार पेठ
लॉकडाऊन 2 – भवानी पेठ, ढोले पाटील रोड, घोलेरोड (ताडीवाला रोड झोपडपट्टी)
लॉकडाऊन 3 – भवानी पेठ, शिवाजीनगर (पाटील इस्टेट झोपडपट्टी), कोंढवा, हडपसर, वानवडी
लॉकडाऊन 4 – घोलेपाटील रोड, ढोले रोड, भवानी पेठ, येरवडा, लक्ष्मीनगर, नागपूर चाळ, वानवडी
लॉकडाऊन 5 (अनलॉक 0.1) – कसबा पेठ – विश्रांतबागवाडा, सिंहगड रोड- जनता वसाहत, पानमळा, घोलेपाटील रोड, ढोले पाटील रोड, बोपोडी, पांडवनगर-जनवाडी