Covid-19 Unlock 4 : मेट्रोपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांपर्यंत, जाणून घ्या 1 सप्टेंबरपासून सुरु होऊ शकतात कोणत्या सेवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोना व्हायरसची प्रकरणे वाढत असताना केंद्र सरकार अनलॉक ४ लागू करण्याची तयारी करत आहे. असा विश्वास आहे की, अनलॉक ४ मध्ये पूर्वीप्रमाणे शाळा व महाविद्यालये बंद राहू शकतात. सध्या देशात कोरोना प्रकरणांची एकूण संख्या ३४,६३,९७२ वर गेली आहे, त्यापैकी २६ लाखांहून अधिक लोक बरे झाले आहेत, तर जवळपास साडेसात लाख ऍक्टिव्ह प्रकरणे आहेत. देशात कोविड-१९ मुळे ६२ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनलॉक ४ ची प्रक्रिया १ सप्टेंबरपासून सुरू होऊ शकते, ज्यामध्ये मर्यादित मेट्रो सेवा पुन्हा सुरू केल्या जाऊ शकतात. गृह मंत्रालय लवकरच अनलॉक ४ संदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करू शकते.

जाणून घ्या अनलॉक ४ मध्ये काय-काय बदल होऊ शकतात…

सूत्रांकडून माहिती मिळत आहे की, अनलॉकच्या या टप्प्यातही शासनाने शाळा महाविद्यालये उघडण्यास परवानगी दिलेली नाही.
विद्यापीठे, आयआयटी आणि आयआयएमसारख्या उच्च शैक्षणिक संस्था सुरू करण्यास परवानगी द्यायची की नाही याबाबत मोठी चर्चा सुरू आहे.
तसेच या टप्प्यात देखील कंटेनमेंट झोनवर कडक निर्बंध कायम राहण्याची शक्यता आहे.
या टप्प्यात मेट्रो सेवा पुन्हा सुरू केल्या जाऊ शकतात.
१ सप्टेंबरपासून चित्रपटगृहे सुरू होण्याची शक्यता जवळजवळ नाही, कारण चित्रपट निर्माते किंवा चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी एकमेकांपासून अंतर ठेवण्याच्या नियमांचे पालन करणे व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य ठरणार नाही.
अनलॉक ४ च्या मार्गदर्शक सूचनांमध्ये केंद्र सरकार केवळ बंदी असलेल्या कामांचा उल्लेख करेल, उर्वरित पुनर्संचयित केले जाऊ शकतात.
अनलॉक ४ दरम्यानही बंदी घातल्या जाणार्‍या अतिरिक्त कामांवर राज्य सरकार अंतिम निर्णय घेऊ शकते.
पुढील महिन्यात सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आणि इतर कार्यक्रमांवर बंदी घालण्याची शक्यता आहे.
बार चालकांनाही त्यांच्या काउंटरवर दारू विक्रीस परवानगी दिली जाऊ शकते, परंतु ग्राहकांनी ती घरी नेण्याची परवानगी असेल. आतापर्यंत बार उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.
आंतरराष्ट्रीय उड्डाणे आणि नियमित ट्रेन सेवा यावेळीही सुरू होण्याची अपेक्षा नाही.