ठाकरे सरकारनं जीमसाठी साधला दसर्‍याचा मुहूर्त, केली ‘ही’ मोठी घोषणा, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना प्रतिबंधात्मक नियम व उपयांचे सक्तीचे पालन करत राज्यातील जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा दसऱ्यापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (शनिवार) केली आहे. जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा या जनतेच्या आरोग्यासाठीच आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जास्तीत जास्त काळजी घेण्यात यावी. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या एसओपीचे काटेकोर पालन करण्यात यावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज जीम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा यांच्या प्रतिनिधींशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या चर्चेत ते बोलत होते. जीम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा या ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी एओपीचे काटेकोर पालन करण्याची ग्वाहीही या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना दिली. पण स्टीम बाथ, सोना बाथ, शॉवर, झुम्बा, योगा असे सामूहिक व्यायाम प्रकार एसओपीतील निर्देशानुसार पूर्णपणे बंद राहणार असल्याचेही सांगण्यात आले.

तर जिम मालकांवर कठोर कारवाई

उपचारांसाठी आपण मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण केल्या आहेत. आता रुग्ण कमी होण्यामुळे रुग्णाशय्या रिकामे राहू लागले आहेत. त्या रिकाम्याच रहाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करुन मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना प्रतिबंधात्मक उपायांकडे दुर्लक्ष झाल्यास, आहे त्या सुविधांवरही अचानक ताण येऊ नये याची खबरदारी घ्यावी लागेल. कारण उपकरणे, सुविधा म्हणजे रुग्णशय्या, व्हेंटिलेटर्स, रुग्णवाहिका या यापूर्वीच आपण पुरेश्या संख्येने उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे विषाणू संसर्ग आटोक्यात येतो आहे, असे दिसतानाच, संसर्ग वाढू नये यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आपण जिम, व्यायामशाळांसाठी एसओपी तयार केली आहे आणि तिचे पालन होणे आवश्यक आहे. या एसओपीचे पालन करण्याची जबाबदारी जिम, व्यायामशाळा यांच्या मालकावर आहे. याचे काटेकोर पालन न केल्यास गलथानपणा आढळल्यास मात्र संबंधितावर कठोर कारवाई करणे भाग पडेल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

या आहेत अटी

आरोग्य विभाग, वैद्यकीय तज्ज्ञ आणि जिम, फिटनेस सेंटर्स, व्यायाम शाळांचे चालक यांनी तयार केलेल्या एसओपीचे पालन करुनच दसऱ्यापासून जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा सुरु करता येणार आहेत. हे नियम तपशीलाने आणि नेमकेपणाने तयार करण्यात आले आहेत.

व्यायाम शाळेच्या वेळा तसेच मर्यादित संख्येत प्रवेश देणे. प्रशिक्षक, अन्य व्यवस्थापकीय अधिकारी यांची वारंवार आरोग्य तपासणी तसेच स्वच्छतेच्या बाबी यासाठी तपशालीने नियमावली तयार करण्यात आली आहे. व्यायाम शाळेत प्रवेश करण्यापासून ते व्यायाम करताना कोण-कोणती काळजी घ्यावी याचे नियम आहेत. शारीरिक अतंर, हातांची स्वच्छता आणि मास्क वापरणे या नियमित गोष्टी बरोबरच, क्षेत्रफळानुसार जास्तीत जास्त सुरक्षित शारीरिक अंतर राखणे. व्यायाम शाळेचे दर तासाला निर्जंतुकीकरण करणे. उपकरणांमध्ये अंतर ठेवणे, वापरानंतर त्याचे निर्जंतुकीकरण करणे. दररोज रात्री जिम, व्यायामशाळा बंद झाल्यानंतर पूर्णपणे निर्जंतुकीकरण करावे लागणार आहे.

बैठकीला मुख्यमंत्र्यांचे सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, डॉ. शशांक जोशी तसेच महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशनचे निखिल राजपुरीया आदी उपस्थित होते.