वीज विभागाचा प्रताप ! शेतात मजुरी करणार्‍या शेतकर्‍याला आलं 26 लाखाचं बिल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्च पासून देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून लॉकडाऊन करण्यात आलं. लॉकडाऊनच्या काळात विजेचं बिल कोणालाच आले नाही. तीन महिन्यांनंतर काहींना वाढीव विजेचं बिल आलं. या भरमसाठ विजेचं बिल आल्याची तक्रार अनेक लोकांनी केली आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये देखील घडली आहे. हजार, बाराशे नाही तर एका शेतकऱ्याला तब्बल २६ लाखांचं विजेचं बिल आल्याची अजब घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शेतकरी कुटुंबाला धक्का बसला आहे. उन्नावमधील वीज विभागाच्या कारनाम्यांमुळे दुसऱ्याच्या शेतात मजुरी करणाऱ्या शेतकऱ्याला भलं मोठं बिल आलं आहे.

दरम्यान, गंगा घाट पोलीस स्टेशन परिसरातील बेहटा गावात राहणारे रामू राठोड यांच्या घरी २६लाख रुपयांचं विजेचं बिल आलं. एवढं मोठं बिल पाहून शेतकरी रामू राठोड यांच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. तेव्हापासून शेतकरी वीज विभागाच्या फेऱ्या मारत आहे. मात्र कोणीही त्याचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाही. याबाबत रामू राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही आणि पाच मुलींचं लग्न करायचं आहे. मला २६ लाख रुपयांचं बिल कसं आलं हे काहीच कळत नाही. अधिकाऱ्यांना याबद्दल सांगितलं तर ते केवळ आश्वासनं देत आहेत, याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही.

ही बाब आता आमच्या निदर्शनास आली. शेतकऱ्याचे वीज बिल तत्काळ बदलण्यात येईल असं म्हटलं आहे. तसेच तांत्रिक अडथळ्यामुळे त्याला२ ६ लाख रुपयांचं वीज बिल गेलं. कधी कधी मीटर ८ हजार,८० हजार यूनिटमधून बिल जनरेट केला जातो. यानुसार आणखी वीज बिलांना तत्काळ योग्य करण्यात येईल.

– उपेंद्र तिवारी, अधिकारी, वीज विभाग

एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील बलरामपूरमध्ये इलेक्ट्रीसिटी विभागाने शेतकऱ्याला तब्बल ६४ लाखांचं बिल पाठवलं होतं. इतकचं नाही तर बिल भरलं नाही म्हणून शेतकऱ्याला नोटीसही पाठविली होती. २९ जुलै २०२० मध्ये शिवकुमार यांच्या पत्नी सुनीता देवीच्या नावावर तब्बल ६४,०२,५०७ रकमेची नोटीस आली होती. ८ ऑगस्टपर्यंत हे बिल जमा करण्याचे निर्देश त्यामध्ये देण्यात आले होते. ही नोटीस मिळताच शिवकुमारचे कुटुंबीय चिंतेत होते. आपली सर्व संपत्ती विकली तरी तो हे बिल भरू शकत नसल्याचं शेतकऱ्याचं म्हणणं होतं. घरात केवळ दोनच बल्ब सुरू असताना एवढं बिल कसं आलं असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.