उन्नाव बलात्कार पिडीतेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी माजी आमदार कुलदीप सेंगर ‘दोषी’, 4 आरोपी ‘निर्दोष’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उन्नाव बलात्कार पीडित मुलीच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी बुधवारी तिस हजारी कोर्टाने निर्णय देत कुलदीपसिंग सेंगरला दोषी ठरवले आहे. कोर्टाने सांगितले की, बलात्कार पीडित मुलीच्या वडिलांना इतक्या अमानुषपणे मारहाण केली गेली की त्यांचा मृत्यू झाला. मृताच्या शरीरावर 18 जखम्या होत्या. या प्रकरणात आरोपी कॉन्स्टेबल अमीर खान याला कोर्टाने निर्दोष मुक्त केले आहे. आणखी एक आरोपी शरदवीर सिंग उर्फ गुड्डू सिंह यालाही कोर्टाने निर्दोष मुक्त केले आहे. दरम्यान, बलात्कार पीडित मुलीच्या वडिलांचा 9 एप्रिल 2018 रोजी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला.

हत्या प्रकरणातील कुलदीप सेंगर आणि इतर आरोपींना न्यायालयाच्या कक्षात आणण्यात आले होते. या प्रकरणात कुलदीप सेंगरसह 10 जणांविरोधात आरोप निश्चित केले आहेत. दरम्यान, उन्नाव बलात्कार पीडित मुलीच्या वडिलांची पोलीस कस्टडीत हत्या केल्याचे म्हंटले जात होते. तिस हजारी कोर्टाने यापूर्वी 29 फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी केली होती आणि निकालासाठी 4 मार्चची तारीख निश्चित केली होती.

55 लोकांनी दिली साक्ष :
मिळालेल्या माहितीनुसार, बलात्कार पीडित मुलीच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने प्रकरण मजबूत करण्यासाठी एकूण 55 साक्षीदारांची विधाने कोर्टात नोंदविली आहेत, ज्यात पीडित मुलीचे काका, आई, बहीण यांच्यासोबत वडिलांचे सहकारी देखील यात सामील आहेत.

बलात्कार प्रकरणात सेंगरला जन्मठेपेची शिक्षा :
4 जून, 2017 रोजी बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीने भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन आमदार कुलदीपसिंग सेंगरवर बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणात, 16 डिसेंबर 2019 रोजी तिस हजारी कोर्टाने कुलदीपसिंग सेंगरला दोषी ठरवत 20 डिसेंबर रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.