‘लसीकरण केंद्रात राजकीय मंडळींची अनावश्यक उपस्थिती, बॅनरबाजी खपवून घेणार नाही’ – अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना लसीकरण केंद्रावर राजकीय मंडळींची अनावश्यक उपस्थिती, बॅनरबाजी खपवून खपवून घेणार नाही. तसेच लसीकरण केंद्रावर देखील निवडणुकीप्रमाणे 100 मीटर आतमध्ये राजकीय मंडळी आणि कार्यकर्त्यांनी थांबू नये अशी आचारसंहिता लागू करा. तसेच परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करा, असा आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत.

पुण्यातील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी या नेतेमंडळीनी शहरातील लसीकरण केंद्रात सुरू असणाऱ्या राजकीय हस्तक्षेपाबद्दल वस्तुस्थिती पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच अनेक ठिकाणी नागरिकांना नोंदणी होऊन देखील लस मिळत नाही, राजकीय दादागिरीला बळी पडावे लागत आहे. तसेच कोरोना लस स्वतःच्या मर्जीतल्या लोकांना कशा मिळतील यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती दिली. ग्रामीण भागात SOP च्या माध्यमातून शासनाने नियमावली तयार केली आहे. तशी पुण्यात देखील राबवावी आणि महापालिकेचे SOP चे स्वतंत्र ऑनलाइन अँप्लिकेशन सुरू करावे, असे आदेश पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले आहेत. यावेळी आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, शिवसेनेचे संजय मोरे, माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड, शाम देशपांडे, प्रशांत बधे उपस्थित होते.