‘हायपरलूप’ची मानवी चाचणी यशस्वी झाली, मराठमोळ्या पुणेकराची महत्त्वाची भूमिका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अरबोपती रिचर्ड ब्रॅन्सन ( Richard Branson) यांच्या वर्जिन हायपरलूपची ( Hyperpool) पहिली मानवी चाचणी करण्यात आली आहे. मागील रविवारी ही चाचणी करण्यात आली असून, यामध्ये २ व्यक्तींनी १६० किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने प्रवास केला. याचबरोबर वर्जिन हायपरलूप ही कंपनी या टेक्नॉलिजीची टेस्टिंग करणारी जगातील पहिली कंपनी ठरली आहे. या टेस्टिंगमध्ये कंपनीचे सीटीओ जोश गिगल आणि पॅसेंजर एक्सपीरिअन्स निर्देशक सारा लुचियान यांनी प्रवास केला. सोमवारी घेण्यात आलेल्या दुसऱ्या मानवी चाचणीत भारतासह पुण्यासाठी अभिमानाची व गौरवास्पद अशी गोष्ट घडली. ती म्हणजे मूळ पुणेकर असलेला तनय मांजरेकर ( Tanay Manjrekar) हा इंजिनियर तरुण दुसऱ्या मानवी चाचणीत सहभागी झाला होता. या दोन मानवी चाचण्यांना मिळालेल्या यशामुळे पुणे- मुंबई दरम्यानच्या प्रस्तावित ‘हायपरलूप’ प्रकल्पाबाबत पुन्हा एकदा सकारात्मक आशा पल्लवित झाल्या आहेत.

४०० मानवरहित टेस्टिंगनंतर मानवी चाचणी
अमेरिकेतील नेवाडा या राज्यात या हायपरलूपची चाचणी करण्यात आली आहे. या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या टेस्टिंग ट्रॅकवर याची चाचणी करण्यात आली. ५ मीटर लांब आणि ३.३ मीटर रुंद ट्रॅक आहे. ही मानवी चाचणी कारण्याआधी कंपनीने ४०० मानवरहित चाचण्या केल्याचा दावा केला आहे. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतरच मानवी चाचणी करण्यात आली आहे. दुसऱ्या मानवी चाचणीत पुण्याच्या तनय मांजरेकरसह हायपरलूपचे सर्व अधिकाऱ्यांना प्रवास करण्याची संधी देण्यात आली होती. यामध्ये पुण्याच्या तनय मांजरेकर याने सहभाग घेतला होता.दरम्यान,या महत्त्वाच्या प्रकल्पात सहभागी झालेला तनय मांजरेकर याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेची पदवी प्राप्त केली आहे. त्याचप्रमाणे तनयने हायपरलूप तंत्रज्ञान विकसनात विद्युत अभियांत्रिकी म्हणून काम पाहिले आहे.तसेच युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियातून विद्युत अभियांत्रिकी शाखेत त्याने पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. २०१६ पासून तन्मय ‘व्हर्जिन हायपरलूप’ मध्ये काम करतो आहे.

या अनुभवाविषयी अधिक माहिती देताना तनय याने सांगितले की, हायपरलूपसाठी काम करायला मिळणे आणि त्याचसोबत प्रवासाची संधी माझ्या जीवनातली फार नावीन्यपूर्ण आणि भाग्याची गोष्ट आहे. माझे स्वप्नच सत्यात उतरल्याची भावना यावेळी मनात आहे. त्याचप्रमाणे आपला भारत देशसुद्धा नवीन क्रांतिकारी तंत्रज्ञानाच्या दिशेने आपला प्रवास सुरू ठेवेल. त्याचबरोबर या प्रकल्पाविषयी माहिती देताना व्हर्जिन हायपरलूपचे संस्थापक रिचर्ड ब्रॅन्सन यांनी सांगितले की, आमची कंपनी मागील अनेक वर्षे अद्वितीय आणि क्रांतिकारी टेक्नॉलॉजी सत्यात उतरवण्यासाठी अपार परिश्रम घेत आहे. आम्ही यशाच्या अगदी जवळ असून, आगामी काळात जागतिक पातळीवर नागरिकांच्या जीवनशैलीत खूप काही परिवर्तन घडणार असल्याचे या मानवी चाचणीमार्फत सिद्ध केले आहे.