पुलवामा हल्ल्याबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने केला निषेध 

न्यूयार्क : वृत्तसंस्था – पुलवामा हल्ल्याविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताला साथ मिळू लागली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनेही हा हल्ला अक्षम्य आणि भ्याड असल्याचे सांगत या हल्ल्याचा निषेध केला आहे. चीनचा समावेश असलेल्या सुरक्षा परिषदेने अत्यंत कठोर शब्दात हल्ल्याचा समाचार घेतल्याने पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

पुलवामा हल्ल्याला कारणीभूत ठरलेल्यांविरोधात कारवाईसाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताला सहकार्य करावे असे आवाहनही सुरक्षा परिषदेने या प्रस्तावाच्या माध्यमातून केले आहे. सुरक्षा परिषदेने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा उल्लेख करत अशा निंदनीय हल्ल्यातील दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी अपेक्षा सुरक्षा परिषदेने व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने पारित केलेला हा ठराव हा पाकिस्तानसाठी मोठा हादरा असल्याचे मानले जात आहे.

संयुक्त राष्ट्र संघ मध्यस्थी करण्यास तयार
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावावर संयुक्त राष्ट्र संघाने नाराजी व्यक्त करत भारत, पाकिस्तानने दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी ‘तत्काळ निर्णय’ घ्यावा असे आव्हान केले होते. तसेच दोन्ही देश तयार असतील तर याबाबत आपण मध्यस्थी करण्यास तयार आहोत असे संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव अँटोनिओ गुटेरेस म्हणाले होते.

पाकिस्तानची संयुक्त राष्ट्रात धाव
मागील आठवड्यात जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलण्यात आली आहेत. पाकिस्तानशी व्यापारी संबंध तोडण्यात आले असून त्यांची आर्थिक कोंडी करण्यात आली आहे. भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे भयभीत झालेल्या पाकिस्तानने संयुक्‍त राष्ट्रांकडे धाव घेऊन भारत-पाकमधील तणाव कमी करण्याची विनवणी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी संयुक्‍त राष्ट्राला पत्र पाठवून केली होती.